दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ सध्या भारत दौऱ्यावर आला आहे. तीन सामन्यांची टी २० मालिका १-१ अशी बरोबरीत राहिली. आता २ ऑक्टोबरपासून तीन कसोटी सामन्यांची मालिका सुरु होत आहे. या मालिकेतील पहिला सामना विशाखापट्टणमच्या डॉ. वाय एस राजशेखर रेड्डी स्टेडियमवर होत आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाने एक दिवस आधी आपल्या संघाची घोषणा केली. या संघात ऋषभ पंत ऐवजी ऋद्धिमान साहाला पसंती देण्यात आली आहे.
साहा जगातील सर्वोत्कृष्ट विकेटकिपर असल्याचे विराट कोहलीने म्हटले आहे. ३४ वर्षीय साहा दुखापतीमुळे दीर्घ काळापर्यंत संघाबाहेर होता. ऑगस्टमध्ये विंडीज विरोधातील कसोटी मालिकेत त्याने पुनरागमन केले होते. पण त्याला या मालिकेत खेळण्याची संधी मिळाली नाही. दोन्ही सामन्यात पंतनेच विकेटकिपींग केले.
टेनिस कोर्टवर लढणारा जोकोविच चक्क सुमो पहिलवानासोबत भिडला!
कोहली म्हणाला की, साहा तंदूरुस्त असून तो खेळण्यासाठी सज्ज आहे. तो आमच्यासाठी मालिकेची सुरुवात करेल. त्याच्या विकेटकिपींगबाबत सर्वांनाच माहीत आहे. त्याला जेव्हा-केव्हा संधी मिळाली, त्याने त्याचे सोने केले आहे. दुर्देवाने दुखापतीमुळे त्याला संघाबाहेर राहावे लागले. माझ्यामते, तो जगातील सर्वोत्कृष्ट विकेटकिपर आहे.
विराट म्हणाला की, कसोटी क्रिकेटमध्ये एक तज्ज्ञ विकेटकिपर म्हणून आम्ही नेहमीच साहाचे समर्थन करत आलो आहोत. कसोटी क्रिकेटसाठी तो नेहमी आमची पहिली पसंती आहे. त्याने नेहमी दबावाच्या वेळी संघासाठी चांगले योगदान दिलेले आहे.
हरियाणा विधानसभा : बबिता फोगट अन् योगेश्वर दत्त यांना तिकीट
साहाने त्याची शेवटची कसोटी जानेवारी २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरोधातच खेळली होती. त्याच्या गैरहजेरीत पंतने जबाबदारी सांभाळली. त्याने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये शतक करत संघात जम बसवण्याचा प्रयत्न केला. पण गेल्या काही काळापासून खराब शॉट निवडीमुळे तो टीकाकारांच्या रडारवर आला. त्यामुळेही संघ व्यवस्थापनाने पंतऐवजी साहाला संधी दिली. साहाने ३२ कसोटीत ३०.६३ च्या सरासरीने ११६४ धावा बनवल्या.