पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

World Cup : गड्यांनो विराटला एकटे पाडू नका, सचिनचा शिलेदारांना संदेश

विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर

क्रिकेटच्या मैदानातील आपल्या सातत्यपूर्ण खेळीनं क्रिकेट चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनलेला भारताचा कर्णधार विराट कोहलीला संघातील खेळाडूंनी साथ द्यावी, असा संदेशच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने विश्वचषकात भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या शिलेदारांना दिला आहे. विराट कोहली एकटा आपल्याला विश्वचषक मिळवून देऊ शकत नाही. तर त्याला संघातील इतर खेळाडूंनीही साथ द्यावी लागेल, असे सचिन तेंडुलकरने पीटीआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे. 

सध्याच्या घडीला फार्मात असलेल्या विराट कोहलीची नेहमीच सचिनसोबत तुलना केली जाते. याच पाश्वभूमीवर आगामी विश्वचषकात विराटची कामगिरी किती महत्त्वपूर्ण आहे याबाबत सचिनला प्रश्न विचारण्यात आला. १९९६, १९९९ आणि २००३ च्या विश्वचषकात तुझ्यावर जितका दबाव होता त्याचप्रमाणे यंदाच्या विश्वचषकात विराट कोहलीवर दबाव असेल का? असा प्रश्न सचिन तेंडुलकरला विचारण्यात आला होता. 

बड्या मोहिमेला जाण्यापूर्वी शास्त्री धोनीबद्दलही भरभरुन बोलले

यावर तेंडुलकर म्हणाला की, "तुमच्याकडे प्रत्येक सामन्यात चांगली कामगिरी करणारे काही खेळाडू असतात. परंतु संघातील इतर खेळाडूंशिवाय तुम्ही काही करु शकत नाही. एका खेळाडूच्या जोरावर एखादी स्पर्धा जिंकणे शक्य नसते. दुसऱ्या खेळाडूंनाही महत्त्वपूर्ण योगदान द्यावे लागते. जर तसे झाले नाही तर पदरी निराशाच पडते."  

भारतीय संघात चौथ्या क्रमांकाचा तिढा अद्यापही कायम आहे. चौथ्या क्रमांकावर नक्की कोण फलंदाजी करणार याचे ठाम उत्तर आजही आपल्याला मिळत नाही. याबद्दलही सचिनला प्रश्न विचारण्यात आला. यावर सचिन म्हणाला की, "चौथ्या क्रमांकाची काही समस्या आहे असे मला अजिबात वाटत नाही. आपल्याकडे या क्रमांकावर खेळण्याची क्षमता असणारे फलंदाज आहेत. कोणत्या फलंदाजाला संधी द्यावी याचा निर्णय परिस्थितीनुसार घेतला जाईल." 

यावेळी सचिनने क्रिकेट फलंदाजीपूरक होत असल्याबद्दलही नाराजी व्यक्त केली. तो म्हणाला की, "दोन नवीन चेंडू आणि सपाट खेळपट्टी यामुळे गोलंदाजांचे अक्षरश: हाल होत आहेत. इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील एकदिवसीय सामन्यांचा दाखला देत सचिन म्हणाला की, एखादा संघ धावफलकावर ३५० धावा लावत आहे. तर दुसरा संघ ४५ षटकातच हे लक्ष्य पूर्ण करतो आहे.  क्रिकेटमधील  या परिस्थितीचा विचार करण्याची गरज आहे. जर दोन्ही डावात नवीन चेंडू वापरायचा असले तर खेळपट्टी गोलंदाजांना पोषक बनवायला हवी. हे शक्य नसेल तर एकच चेंडू वापरण्याचा पूर्वीचा नियम अंमलात आणावा त्यामुळे गोलंदाजांना किंमान चेंडू रिव्हर्स स्विंग करणे तरी शक्य होईल." 

भारतीय क्रिकेट संघातही PUBG प्रेमी मंडळ

यंदाच्या स्पर्धेत फिरकीपटूंची भूमिका महत्त्वपूर्ण ठरेल असे सांगत त्याने युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव स्पर्धेत चांगली कामगिरी करतील, असा विश्वास व्यक्त केला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध ही जोडी फारशी प्रभावी कामगिरी करु शकली नव्हती. ऑस्ट्रेलिया विरुद्धचे अपयश विसरुन दोघांनी मैदानात उतरावे, असेही सचिन यावेळी म्हणाला.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ICC World Cup 2019 Virat Kohli alone cant win World Cup others will need to step up Says Sachin Tendulkar