पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

WC #INDvSL: पाच खास अन् अनोख्या विक्रमांवर एक नजर!

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यानंतर झालेले खास पाच विक्रम

लीड्सच्या मैदानात श्रीलंकेला नमवत भारतीय संघ गुणतालिकेत अव्वलस्थानी पोहचला आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या सामन्याच्या निकालानंतर भारत अव्वल स्थानी कायम राहणार की ऑस्ट्रेलिया यावरुन सेमीफायनलचं समीकरण स्पष्ट होणार आहे. पण तत्पूर्वी आपण एक नजर टाकूयात आजच्या सामन्यानंतर झालेल्या काही खास विक्रमांवर

पाकला मागे टाकतं भारताची ऑस्ट्रेलियाशी बरोबरी

या सामन्यासह भारताने एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेला तब्बल ९१ वेळा पराभूत करत पाकला मागे टाकले. पाकिस्तानने ९० एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेला पराभूत केले आहे. प्रतिस्पर्धी संघाला एकदिवसीयमध्ये सर्वाधिकवेळा पराभूत करणाऱ्या संघामध्ये ऑस्ट्रेलिया आणि भारत यांची बरोबरी झाली आहे. ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला ९१ एकदिवसीय सामन्यात पराभूत केले आहे. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला ८२ तर भारताला ७७ वेळा पराभूत केले आहे. 

विश्वचषकात दोन्ही सलामवीरांची एकाचवेळी शतकं

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात लोकेश राहुल आणि रोहित शर्मा यांनी दोघांनी शतकी खेळी केली. रोहित शर्माने १०३ तर लोकेश राहुलने १११ धावा केल्या. या यादीत श्रीलंकेची जोडी आघाडीवर आहे. उपल थरंगा आणि दिलशान या सलामी जोडीनं दोनवेळा एकाच वेळी शतके झळकावली होती. २०११ च्या विश्वचषकात झिम्बाब्वे विरुद्ध थरंगा (१३३) आणि तिलकरत्ने दिलशानने (१४४) धावा केल्या होत्या. याच स्पर्धेत इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात या जोडीनं थरंगा (१०२) आणि दिलशान (१०८) धावांची नाबाद खेळी केली होती.  

विश्वचषकात भारताकडून सर्वोच्च सलामी 

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात लोकेश राहुल आणि रोहित शर्मा या सलामी जोडीने १८९ धावांची भागीदारी रचली. आतापर्यंतच्या विश्वचषकातील भारताकडून झालेली ही सर्वोच्च भागीदारी आहे. यापूर्वी बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात या जोडीने १८० धावांची सलामी दिली होती. यावेळी रोहितने शिखर धवन सोबत आयर्लंडविरुद्ध केलेल्या १७४ धावांची भागीदारीचा विक्रम मागे टाकला होता. १९९६ च्या विश्वचषक स्पर्धेत सचिन तेंडुलकर आणि -अजय जडेजा यांनी केनियाविरुद्धच्या सामन्यात १६३ धावांची भागीदारी रचली होती. तर २००३ च्या विश्वचषकात सचिन-सेहवाग जोडीने श्रीलंकेविरुद्ध १५३ धावांची खेळी केली होती.

विश्वचषकात सर्वाधिक शतके

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने विश्वचषकातील सहावे शतक झळकावले. १६ सामन्यात त्याच्या नावे ६ शतकांची नोंद झाली आहे. विक्रमादित्य सचिन तेंडुलकरने विश्वचषकातील ४४ सामन्यात ६ शतके झळकावली होती. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगच्या नावे ४२ सामन्यात ५ तर श्रीलंकेचा माजी सलामीवीर कुमार संगकाराच्या नावे ३५ सामन्यात ५ शतकांची नोंद आहे. 

विश्वचषकाच्या एका हंगामात सर्वाधिक शतकांचा विक्रम

रोहित शर्माचे यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतील हे पाचवे शतक आहे. त्याने संगकाराच्या विक्रम मोडीत काढत नवा किर्तीमान आपल्या नावे केला. संगकाराने २०१५ च्या विश्वचषकात ४ शतके झळकावली होती.