विश्वचषक स्पर्धेला झोकात सुरुवात करणाऱ्या भारतीय संघाला शिखर धवनच्या दुखापतीमुळे मोठा धक्का बसला आहे. धवनच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला झालेल्या दुखापतीनंतर त्याची जागा कोण घेणार? ही चर्चा आता जोर धरु लागली आहे. सध्याच्या घडीला १५ सदस्यीय संघात असलेला आणि स्पर्धेतील सुरुवातीच्या दोन सामन्यात इलेव्हनमध्ये स्थान मिळालेला लोकेश राहुलच भारताच्या डावाची सुरुवात करेल, हे जवळ-जवळ निश्चित आहे.
याशिवाय सध्या दोन नावांची चर्चा जोर धरु लागली आहे. श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यापैकी एकाची भारतीय संघात वर्णी लागू शकते, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरु आहे. शिखर धवनच्या अनुपस्थितीत ऋषभ पंतला संधी मिळू शकते असे क्रिकेट जाणकारांचे मत आहे. यापरिस्थिती लोकेश राहुल रोहितसोबत डावाला सुरुवात करेल, असे भाकितही काहीजण करत आहेत. पंतला विश्वचषकासाठी निवडलेल्या संघात स्थान न मिळाल्याने सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले होते. त्यानंतर बीसीसीआयने अंबाती रायडू आणि ऋषभ पंत यांचा राखीव खेळाडू असतील, असे जाहिर केले होते.
आयसीसीचा नियम काय सांगतो...
आयसीसीच्या नियमानुसार, एखाद्या संघातील खेळाडूने संपूर्ण स्पर्धेतून माघार घेतली तरच राखीव खेळाडूला संघात स्थान देण्यात येऊ शकते. बीसीसीआय याबाबत काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
रिप्लेसमेंट शिवाय काय असेल भारताचा प्लॅन
भारतीय संघाने रिप्लेसमेंटशिवाय खेळण्याचा निर्णय घेतला तर रोहित शर्मासोबत लोकेश राहुल भारतीय डावाची सुरुवात करेल. या परिस्थितीत चौथ्या क्रमांकावर दिनेश कार्तिक किंवा विजय शंकरला संधी मिळू शकते.