पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ICC WC 2019 : टीम इंडियाचे 'कॅलक्युलेशन' गडबडण्याची भीती

चहल, धोनी आणि कोहली

विश्वचषकातील ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यातील शतकवीर शिखर धवनच्या दुखापतीमुळे न राहूनही टीम इंडियाचे कॅलक्युलेशन गडबडण्याची भीती मनात उसळ्या घेऊ लागली आहे. क्रिकेटचा गेम हा एका खेळाडूवर अवलंबून नसला, तरी एका खेळाडूची कमतरता भरुन काढणे हे देखील सोपे नसते. त्यात फॉर्ममध्ये आलेला खेळाडू जायबंदी ही संघाला वेदनादायी ठरु शकते. धवनला झालेली दुखापत गंभीर असली, तरी आयसीसी स्पर्धांतील त्याच्या कामगिरीमुळे बीसीसीआयला त्याची विकेट सोडण्याचा खंबीर निर्णय घेणे अवघड होऊन बसले आहे. 

जवळपास सहा आठवडे चालणाऱ्या विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होऊन दोन आठवडे होत आले आहेत. उर्वरित चार आठवड्यांच्या खेळ उरला असताना दुखापतीमुळे धवनला तीन आठवड्यांची विश्रांती देण्यात आली आहे. अखेरच्या महत्त्वपूर्ण लढतीत तो 'कमबॅक' करेल, अशी बीसीसीआयला आस आहे. त्यामुळेच त्यांनी राखीव खेळाडूचे नाव तूर्तास आयसीसीकडे पाठवण्याचा निर्णय घेतलेला नाही. पण 'बॅकअप'साठी त्यांनी पंतला बोलावले आहे. क्रिकेटच्या मैदानात आपण पंचाच्या निर्णयाविरोधात अनेकदा कर्णधार रिव्ह्यू प्रणालीचा वापर करताना पाहतो. धवन संदर्भात सध्या अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अंगठ्याला दुखापत झाल्यानंतर धवन स्पर्धेतून 'आउट' झाल्याची चर्चा जोर धरत असताना बीसीसीआयने रिव्ह्यूचा वापर करावा तशी भूमिका घेतली आहे. 

Video : न्यूझीलँडविरुद्धच्या सामन्यापूर्वी धवनच्या मैदानात 'चकरा'

क्रिकेटच्या मैदानात रिव्ह्यू घेतल्यानंतर सर्वप्रथम गोलंदाजाच्या फ्रंन्टफूटची चाचपणी केली जाते. त्यानंतर बॅटची कड घेतली आहे किंवा नाही याचा मागोवा घेत पंच आपला निर्णय देतात. अगदी याच प्रक्रियेतून धवन जात आहे. दुखापतीनंतर स्कॅन, त्यानंतर रिपोर्ट आणि फिटनेससाठी थोडी विश्रांती दिल्यानंतर बीसीसीआय आपला फायनल निर्णय देईल. धवन ज्या रिव्ह्यू सिस्टिममधून जातोय, त्यात बीसीसीआयची वन मॅन आर्मीची भूमिका असेल. बीसीसीआयच्या या निर्णयामागे अनेक कारणे असू शकतात. त्यातील एक कारण म्हणजे धवनच्या दुखापतीमुळे संघावर कोणताही नकारात्मक प्रभाव पडू नये आणि प्रतिस्पर्धी संघाला बळ मिळू नये, याची ही खबरदारी असावी असे मानायला हरकत नाही.

संघातील खेळाडूच्या दुखापतीनंतर संघ व्यवस्थापनामध्ये अनेक प्लॅन शिजत असतात. २००७ मध्ये पहिल्या टी-२० विश्वचषकात भारताने पाकिस्तानला नमवत विश्वचषक उंचावल्याचे आपण पाहिले आहे. मेगा फायनलपूर्वी भारताचा सलामीवीर वीरेंद्र सेहवाग जायबंदी झाला होता. सामन्याच्या आदल्या दिवशी तो नेटमध्ये प्रॅक्टिस करताना दिसला. पण तो फायनलमध्ये खेळूच शकत नाही, हे संघातील सर्वांना माहिती होते. प्रतिस्पर्धी पाकिस्तानच्या डोक्यात तो खेळणार नाही हा विचार आलाच नाही. टीम इलेव्हनमध्ये जेव्हा अचानक वीरेंद्र सेहवागऐवजी पठाणला संधी देण्यात आली त्यावेळी भारतीय क्रिकेट चाहत्यांसह प्रतिस्पर्धी पाकिस्तानी संघालाही ते एक सरप्राईज होते. या मुद्याचा उल्लेख करण्याचे कारण असे की, आपला गडी बाद झाल्याने आपली ताकद कमी वाटू नये, यासाठी खेळाच्या मैदानात अशी रणनीती आकारली जाते. असाच काहीसा प्लॅन धवनच्या बाबतीत ही असू शकतो. 

ICC WC 2019 : 'जर-तर' समीकरणातून पंतच इंग्लंडला जाणार हे ठरलं

जखमी वाघ बरा व्हावा आणि बीसीसीआयचा रिव्ह्यू भारतीय संघासाठी फायदेशीर ठरावा, अशीच इच्छा तमाम भारतीयांची असेल. पण जर रिव्ह्यू उलटा फिरला तर काय? ज्यावेळी सर्व काही ठीक सुरु असते तेव्हा कोणी टीका करायचा प्रश्न उरत नाही. पण जेव्हा वारे उलट्या दिशेने वाहू लागतात तेव्हा अनेक प्रश्न निर्माण होवू शकतात. याचाही बीसीसीआयने विचार करायला हवा.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: ICC World Cup 2019 Rishabh Pant Comes in as Cover for Injured Shikhar Dhawan And BCCI Decision and Game Plan