रबाडाच्या पहिल्या षटकातील चौथ्या चेंडूवर रोहित हवेत टोलावलेला चेंडू त्याला तंबूत जायला भाग पाडेल असे वाटले होते. पण आफ्रिकेच्या क्षेत्ररक्षकांनी हवी ती चपळाई दाखवली नाही अन् अडखळत खेळणाऱ्या रोहितला दिलासा मिळाला. शिखर धवन माघारी गेल्यानंतर त्याच्यावर दबाव वाढणे स्वाभाविक होते. पण त्याचा संयम ढळला नाही. त्यानं कोहलीसोबत डावाला आकार देण्याच आपल काम सुरुच ठेवल. भारताच्या डावातील आठव्या षटकात रबाडाच्या गोलंदाजीवर त्याने षटकार खेचला अन् रोहित जागा होतोय याचे संकेत मिळाले. याच षटकात त्याने एक चौकारही लगावला.
Video : #INDvSA रबाडानं आधी गब्बरची बॅट तोडली अन् मग ...
कोहली बाद झाल्यानंतर त्याने लोकेश राहुलसोबत महत्त्वपूर्ण भागीदारी केली. यादरम्यान त्याने पुन्हा गियर बदलल्याचे पाहायला मिळाले. अर्धशतकाचा टप्पा गाठण्यासाठी त्याने तब्बल ७० चेंडू घेतले. त्यानंतर पुढच्या ५८ चेंडूत त्याने शतकाला गवसणी घातली. विश्वचषक स्पर्धेतील रोहितचे हे दुसरे शतक असून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याचे हे २३ वे शतक आहे. आपल्या १२८ चेंडूतील शतकी खेळीत त्याने १० चौकार आणि दोन षटकार खेचले.
VIDEO : #INDvSA सलामीच्या सामन्यात चहलचा कहर
धावांचा पाठलाग करताना रोहित शर्माचे हे अकरावे शतक आहे. या यादीत विराट कोहली अव्वलस्थानी आहे. धावांचा पाठलाग करताना कोहलीने २५ वेळा शतकी खेळी साकारली आहे. तर त्याच्यानंतर सचिन तेंडुलकर (१३) आणि ख्रिस गेल (१२) शतकांसह दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आहेत. या शतकासह रोहितने या यादीत श्रीलंकेच्या दिलशानच्या ११ शतकांशी बरोबरी केली आहे. रोहितचे हे आतापर्यंत केलेले सर्वात धीम्यागतीचे शतक आहे.