विश्वचषकात पहिल्यांदा भारतीय संघाचे नेतृत्व करणाऱ्या विराट कोहलीच्या संघासमोर बुधवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भिडणार आहे. स्पर्धेतील सलग दोन पराभवामुळे आफ्रिकेचा संघाचा आत्मविश्वास ढासळला आहे. विराट ब्रिगेड याचा फायदा उठवत स्पर्धेत विजयी सलामी देणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. क्रिकेट जगतात फलंदाजीमध्ये अव्वलस्थानी असलेल्या कोहलीसाठी ही स्पर्धा नेतृत्वाची कसोटी घेणारी असेल. भारतीय संघ संतुलित असून ताफ्यात सामन्याला कलाटणी देणाऱ्या शिलेदारांजा भरणा आहे. भारतीय संघाने मागील नऊ एकदिवसीय सामन्यातील सहा सामने जिंकले आहेत. २०१७ मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये फायनलपर्यंत धडक मारलेला भारतीय संघाला यंदाच्या स्पर्धेचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेला सलामीच्या सामन्यात यजमान इंग्लंडने पराभूत केले आहे. तर दुसऱ्या सामन्यात त्यांना बांगलादेशनेही पराभवाचा धक्का दिला.
ICC WC 2019 : आफ्रिकेचा संघ धोकादायक : विराट कोहली
याशिवाय संघातील खेळाडू दुखापतीने त्रस्त आहेत. त्यांचा प्रमुख गोलंदाज असलेल्या डेल स्टेनने स्पर्धेतून माघार घेतली आहे. याशिवाय जलदगती गोलंदाज लुंगी एन्गिडी आणि भरवशाचा फलंदाज हाशिम आमलाही दुखापतीतून सावरण्याचा प्रयत्न करतोय. एकूण दोन पराभव आणि दुखापतीनं ग्रस्त संघाला भारतासोबतचा सामना जिंकणे फारच आव्हानात्मक आहे. साऊथहॅम्प्टनमधील द रोझ बाऊलची खेळपट्टी गवत नाही. त्यामुळे ही खेळपट्टी फलंदाजासाठी अनुकूल असेल, असे मानले जात आहे. सामन्यावर पावसाचे देखील सावट आहे. कोहली भुवनेश्वर कुमारला संधी देणार का? हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरेल.
सराव सामन्यात रविंद्र जडेजाने चांगली कामगिरी केली होती. त्याला संधी मिळणार का? कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल जोडीवर कर्णधार विश्वास ठेवणार? याशिवाय एकही सामना न खेळता केदार जाधवला संधी मिळणार की विजय शंकरची वर्णी लागणार? या अनेक प्रश्नांची उत्तरे उद्याच्या सामन्यातील संघ निवडीनंतरच मिळतील. दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्याच्या घडीला बॅकफूटवर असला तरी कागिसो रबाडाच्या गोलंदाजीत सामना फिरवण्याची ताकत आहे, हे देखील भारतीय संघाला विसरुन चालणार नाही. वातावरणाने काटा बदलला तर रबाडा घातक ठरू शकतो. रोहित-धवन जोडीची डोकेदुखी वाढवण्याची क्षमता त्याच्यात आहे. भारतीय सलामी जोडीचा आत्मविश्वास म्हणावा तसा दिसलेला नाही. ही जोडी लवकरात लवकर लयीत येणे स्पर्धेच्या दृष्टिने महत्त्वपूर्ण आहे.
ICC WC 2019 : आफ्रिकेला मोठा धक्का, स्टेन 'गन' निकामी
लेग स्पिनरच्या विरुद्ध रोहित शर्मा चाचपडताना दिसला आहे. दक्षिण आफ्रिकी कर्णधार फाफ ड्युप्लेसीस याचा फायदा घेत इमरान ताहिरच्या हाती लवकर चेंडू सोपवू शकतो. चौथ्या क्रमांकावर लोकेश राहुलची वर्णी जवळ जवळ निश्चित आहे. तो दबावात कशी खेळी करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात लोकेश राहुल आणि धोनीनं दमदार खेळी केली होती. त्यांच्याकडून आशाच खेळीची अपेक्षा आहे.