इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरु असलेल्या विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशला नमवत भारतीय संघाने उपांत्य फेरीतील आपले स्थान पक्के केले आहे. श्रीलंकेविरुद्धच्या साखळी सामन्यातील अखेरच्या लढतीत गुणतालिकेत आघाडीचे स्थान मिळवण्यासाठी भारतीय संघ प्रयत्नशील असेल.
या सामन्यात आणखी एक मोठी खेळी करुन हिटमॅन रोहितला विश्व विक्रम प्रस्थापित करण्याची संधी आहे. रोहित शर्माने आतापर्यंत झालेल्या सामन्यात ९०.६६ च्या सरासरीनं ५४४ धावा करत स्पर्धेत सर्वोधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वलस्थानी आहे.
ICC WC #INDvBAN : रोहितला संधी म्हणजे शतकाची नांदी!
विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावांचा सचिन तेंडुलकरचा विक्रम मागे टाकून नवा पराक्रम आपल्या नावे नोंदवण्याची रोहितकडे संधी आहे. २००३ च्या विश्वचषक स्पर्धेत सचिननं ६७३ धावा केल्या होत्या. रोहित शर्मा या विक्रमापासून १२९ धावा दूर आहे. भारतीयसंघ श्रीलंका आणि सेमी फायनलमधील अशा दोन सामन्यात रोहित या विक्रमाला गवसणी घालणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
विश्वचषक स्पर्धेतील साखळी सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. २००३ मध्ये साखळी सामन्यात सचिनने ५८६ धावा केल्या होत्या. सचिनचा हा विक्रम मागे टाकण्यासाठी रोहितकडे श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात अखेरची संधी असेल. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात ४२ धावांची खेळी करुन रोहित सचिनला मागे टाकू शकेल.
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात १०४ धावांची खेळी करत विश्वचषकाच्या एका हंगामात सर्वाधिक चार शतके साजरे करणाऱ्या संगकाराच्या विक्रमाशी रोहितने बरोबरी केली होती. उर्वरित सामन्यात एक शतक झळकावले तर रोहितच्या नावे एका हंगामात विश्वचषकात सर्वाधिक शतके झळकावण्याचा विश्वविक्रम आपल्या नावावर करता येईल.