विश्वचषक स्पर्धेतील पाकिस्तान विरुद्धच्या 'हाय-होल्टेज' सामन्यात भारताचा सलामीवीर रोहित शर्माने शतकी खेळी करुन एका नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात रोहितने अवघ्या ८५ चेंडूत शतक साजरे केले. एकदिवसीय कारकिर्दीतील त्याचे हे २४ वे शतक आहे. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने ११३ चेंडूत १४ चौकार आणि ३ षटकाराच्या मदतीने १४० धावांची झंजावत खेळी केली.
याशिवाय पाकिस्तानविरुद्ध त्याचे सलग दुसरे शतक आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाकिस्तान विरुद्ध लागोपाठ दोनवेळा शतकी खेळी करणारा रोहित पहिला भारतीय फलंदाज आहे. यापूर्वी कोणत्याही भारतीयाला असा पराक्रम करता आलेला नाही. यापूर्वी रोहित शर्माने आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध शतकी खेळी केली होती. विराटच्या अनुपस्थित भारतीय संघाचे नेतृत्व करताना त्याने पाक विरुद्धच्या सामन्यात त्याने १११ धावांची खेळी केली होती. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ही स्पर्धाही जिंकली होती.
वर्ल्ड कपमध्ये पाकविरुद्धची रेकॉर्ड ब्रेक भागीदारी
यंदाच्या विश्वचषकातील रोहित शर्माचे हे दुसऱे शतक आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात त्याने ११४ चेंडूत १३ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने १२२ धावा केल्या होत्या. तर ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात त्याने संयमी खेळी करत ७० चेंडूत ५७ धावांची खेळी केली होती.