पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ICC WC 2019 : भारताच्या सलग दुसऱ्या विजयामागची पाच कारणे

भारतीय संघाचा विश्वचषक स्पर्धेत सलग दुसरा विजय

ओव्हलच्या मैदानात गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला नमवत यंदाच्या स्पर्धेत तुमच्यापेक्षा आम्हीच भारी आहोत, हे भारतीय संघाने दाखवून दिले. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा कोहलीने घेतलेला निर्णय हा केवळ कादवरचे शेर प्रतिस्पर्धी गोलंदाजांना ढेर करण्याची क्षमता बाळगून आहेत हे दाखवण्यापूरता मर्यादित नव्हता. तर त्याच्या या निर्णयाने ऐकेकाळी ज्या नजरेनं तुमच्याकडे पाहिले जायचे ती ताकद आज आमच्याकडे आहे याचे संकेतच भारतीय संघाने कांगारुंना दिले. जाणून घेऊयात ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यातील भारताच्या विजयामागची पाच कारणे.....

रोहित-धवन जोडी जमली 

सध्याच्या घडीला टॉपला असलेल्या सलामीच्या जोडीनं शतकी भागीदारी रचून भारताचा पाया मजबूत केला. सलामीच्या सामन्यात तू नय्या पार केलीस आता मी करुन दाखवतो, असे म्हणत दुसऱ्या सामन्यात धवनच्या भात्यातून अफलातून फटके पाहायला मिळाले. हिटमॅनची जागा धवनने घेतल्याने प्रतिस्पर्धी कांगारु निश्चितच गांगरून गेला असेल. धवन मागील काही सामन्यात फारसा प्रभावी दिसला नव्हता. पण त्याने आज आपल्यातील धमक दाखवून दिली. दोघांच्यातील चांगली भागीदारीमुळे भारत सुरुवातीपासून बॅकफूटला राहिला. 

कोहलीचा कहर अन् चौथ्या क्रमांकानंतरची उलथापालथ

सलामीच्या जोडीनं कर्णधाराच्या खांद्यावरील ओझं कमी केल्यामुळे त्याला आपला नैसर्गिक खेळ करणे सोपे झाले. तो निवांत खेळत राहिल्यामुळे प्रतिस्पर्धी गोलंदाजांचे खांदे पडले. कोहली मैदानात असला की चौथ्या नंबरला पांड्या येऊनही बदडू शकतो, हे नवं समीकरणही आजच्या सामन्यात पाहायला मिळालं. गेल्या काही दिवसांपासून चौथ्या क्रमांकाबाबत चांगलीच चर्चा रंगत आहे. यावर कर्णधार आणि प्रशिक्षक अनेक पर्याय असल्याचे सांगत आले. आज संघाने ते दाखवून दिले. हार्दिक पांड्यानंतर धोनी आणि अखेरच्या षटकात लोकेश राहुल या प्रयोगाचा प्रतिस्पर्धी गोलंदाजांनी कदाचित विचारही केला नसेल. या प्रयोगान भारताने जी धावांची लयलुट केली त्या धावांनीच विजयाचे अंतर ठरवले.

क्षेत्ररक्षणातील चपळाई

भारतीय संघाने जशी सुरुवात केली अगदी तशीच सुरुवात ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांकडूनही झाली. आपल्या गोलंदाजांना विकेट मिळत नव्हती त्यावेळी चपळ क्षेत्ररक्षण आपल्या कामी आले. फिंचच्या स्वरुपात आपल्याला जी पहिली विकेट मिळाली ती धावबादच्या स्वरुपात होती. केदार जाधवचा थ्रो आणि गोलंदाजीला असलेल्या पांड्याने अप्रतिमरित्या त्याला दिलेला कव्हर यामुळे ऑस्ट्रेलियाच्या सलामीचे गणित बिघडले. अन् भारतीय संघ बॅकफूटवर जाईल अशी निर्माण झालेली भिती दूर झाली. 

भुवीची ती ओव्हर अन् रिव्ह्युने मिळालेलं यश

ऑस्ट्रेलियाचा स्मिथ सध्या चांगलाच फॉर्ममध्ये आहे. भारताविरुद्धही तो मैदानात तग धरुन होता. जोपर्यंत तो मैदानात होता तोपर्यंत सामना त्यांच्याकडून झुकण्याची संधी निश्चित होती. भुवनेश्वरने त्याला चकवले आणि सामना भारताच्या बाजूने कलला. विशेष म्हणजे भुवीने स्मिथविरोधात केलेले पायचितचे अपील पंचांनी फेटाळून लावले होते. पण रिव्ह्युनंतर पंचांना आपला निर्णय बदलावा लागला. हा सामन्यातील एक टर्निंग पॉइंटच ठरला. त्याच्यापाठोपाठ भुवीने स्टॉयनिसला शून्यावर बाद करत ऑस्ट्रेलियाच्या अडचणी वाढवल्या.

चहल-बुमराह यांनी मोक्याच्या क्षणी घेतलेल्या विकेट्स

स्मिथसोबत उस्मान ख्वाजा चांगलीच फटकेबाजी करत होता. पण बुमराहने त्याला त्रिफळाचित करत मोक्याच्या क्षणी भारताला यश मिळवून दिले. चहलने वॉर्नर आणि मॅक्सवेलला बाद करत विजयात आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले.
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:icc world cup 2019 india vs australia match 14 this is Five reasons of india win the match