विश्वचषक स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्याचा प्रवास खडतर झाला असताना यजमान इंग्लंडला आणखी एक धक्का बसला आहे. सलामीवीर जेसन रॉय दुखापतीतून अद्याप सावरला नसल्याने तो मंगळवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याला मुकणार आहे. यापूर्वी दोन सामन्याला मुकल्यानंतर सोमवारी झालेल्या फिटनेस चाचणीत तो अपयशी ठरला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडला त्याच्याशिवायच मैदानात उतरावे लागणार आहे. रविवारी भारताविरुद्धच्या सामन्यात तो संघात पुनरागमन करेल, अशी इंग्लंड संघाला आशा आहे.
१४ जून रोजी वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात जेसन रॉय हॅमस्ट्रींगच्या दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले होते. त्यानंतर तो श्रीलंका आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्याला मुकला होता. रॉयच्या फिटनेसबद्दल रॉयटर्सला दिलेल्या प्रतिक्रियेवेळी कर्णधार इयॉन मॉर्गन म्हणाला की, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यासाठी रॉय फिट होईल, अशी आशा होती. पण तो दुखापतीतून सावरलेला नाही. हा आमच्यासाठी मोठा धक्का आहे. तो चांगल्या लयीत खेळत आहे. मागील खूप काळापासून तो संघाचा सदस्य आहे. जेसन रॉयने बांगलादेश विरुद्ध १५३ धावांची धमाकेदार खेळी केली होती.
ICC World Cup 2019 Point Table: चौथ्या स्थानासाठी चार संघ
रॉयच्या अनुपस्थितीत जेम्स विंसने बेअरस्टोसोबत इंग्लंडच्या डावाला सुरुवात केल्याचे पाहायला मिळाले. त्याने अफगाणिस्तान विरुद्ध १४ तर श्रीलंके विरुद्ध २६ धावांची खेळी केली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्ध विंस चांगली कामगिरी करेल, असा विश्वास यावेळी कर्णधार मॉर्गनने व्यक्त केला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या पराभवामुळे स्पर्धेच्या सुरुवातीला प्रबळ दावेदार समजल्या जाणाऱ्या इंग्लंडचा विश्वचषकातील उपांत्यफेरीतील प्रवेशाची वाट अवघड झाली आहे. इंग्लंडला उर्वरित तीन सामन्यापैकी दोन सामने कोणत्याही परिस्थितीत जिंकावे लागणार आहेत.