पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विराट सेना उपांत्यफेरीपर्यंत सहज पोहचेल, दिग्गजाची भविष्यवाणी

आगामी विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला प्रबळ दावेदार मानले जात आहे.

 इंग्लंडमध्ये रंगणाऱ्या आगामी विश्वचषक स्पर्धेत विराट ब्रिगेड उपांत्य फेरीपर्यंत सहज मजल मारेल, असे भाकित एका माजी आणि दिग्गज क्रिकेटपट्टूने केले आहे. ३० मे पासून इंग्लंडमध्ये विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघ प्रबळ दावेदार मानला जात आहे. मागील वर्षभरामध्ये विराटच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळेच लोकप्रिय अशा क्रिकेटच्या महाकुंभात भारतीय संघ चांगली कामगिरी करेल, असे मत श्रीलंकेचा माजी गोलंदाज चमिंडा वास याने व्यक्त केले आहे.

पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना वास म्हणाला की, "मागील २-३ वर्षांपासून भारतीय संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत आहे. सध्याच्या भारतीय ताफ्यात चांगल्या क्षमतेचे जलदगती गोलंदाजीचे पर्याय उपलब्ध आहेत. भारतीय गोलंदाजांमध्ये सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता आहे. भारतीय संघ समतोल आहे, असून तो विश्वचषकाच्या उपांत्य फेरीपर्यंत सहज पोहचेल.” 

३० मे पासून सुरु होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी निवडलेल्या संघानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. भारतीय निवड समितीने ऋषभ पंत आणि अंबाती रायडूला वगळल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते. यासंदर्भात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्याचेही पाहायला मिळाले. त्यामुळे विश्वचषकात भारतीय संघ कशी कामगिरी करतो, हे पाहणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. भारतीय संघ ५ जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विश्वचषकातील आपला पहिला सामना खेळणार आहे.