सध्या कसोटीत सर्वोत्तम फलंदाज कोण आहे, यावर क्रिकेटच्या जाणकारांमध्ये टॉपच्या दोन खेळाडूंच्या नावाची मोठी चर्चा असते. ऑस्ट्रेलिय फलंदाज स्टिव्ह स्मिथ आणि भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यांचा खेळ कोणत्याही स्तरावर एकमेकांपेक्षा कमी नाही. क्रिकेटमधील एक वर्षांच्या बंदीनंतर मैदानात परतलेल्या स्मिथने जबरदस्त पुनरागमन केले आहे. आपल्या पुनरागमनाबरोबरच त्याने कसोटी मानांकनात अव्वल असलेल्या विराटला आव्हान दिले आहे.
बंदीनंतर कसोटी संघात स्थान मिळवलेल्या स्मिथने अॅशेस मालिकेत अजून तीनच डाव खेळले आहेत. एक वर्ष क्रिकेटमधून बाहेर राहिलेल्या स्मिथची पहिल्या स्थानावरुन चौथ्या स्थानावर घसरगुंडी उडाली होती. पण वर्षभराची धावांची मोठी भूक असलेल्या स्मिथने पहिल्या कसोटीतील दोन्ही डावात शतक ठोकले. या खेळीच्या जोरावर तो कसोटी क्रमवारीत चौथ्या स्थानावरुन तिसऱ्या स्थानी आला आहे.
स्मिथ लॉर्डस कसोटीतही शतकाकडे वाटचाल करत होता. परंतु, जोफ्रा आर्चरच्या बाऊन्सरने त्याची एकाग्रता भंग पावली. चेंडू त्याच्या मानेला लागला. त्यावेळी तो जमिनीवरच आडवा झाला होता. त्याला मैदान सोडावे लागले होते. पण काही वेळानंतर तो मैदानावर आला आणि ९२ धावा काढून तो बाद झाला. त्यानंतर त्याने या कसोटीतून माघार घेतली.
आलिया भटच्या बेस्टफ्रेंडशी प्रेमसंबंधांच्या चर्चेनंतर के एल राहुल म्हणतो...
त्याचा ९२ धावांच्या खेळीने त्याला एका क्रमांकाचा फायदा झाला आणि तो दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. आयसीसी कसोटी मानांकनात आता स्मिथचे ९१३ गुण आहेत. तो विराटपेक्षा अवघ्या ९ गुणांनी मागे आहे. जर त्याने तिसऱ्या कसोटीतही शतक केले तर तो पुन्हा विराटला (९२२ गुण) मागे टाकून अव्वल स्थानी विराजमान होईल.
विराटला दोघांमधील अंतर वाढवण्याची संधी आहे. विंडीज विरोधात अँटिग्वा येथे पहिली कसोटी होणार आहे. या सामन्यात वैयक्तिक चांगली धावसंख्या उभारुन स्वतःची क्रमवारी सुधारण्याबरोबर संघाला विजय मिळवून देण्याची त्याला संधी चालून आली आहे.
VIDEO: स्मिथनंतर जोफ्राचा लाबुशेनला जबरा 'बाऊन्सर'
विराट मागीलवर्षी म्हणजे ऑगस्ट २०१८ पासून पहिल्या क्रमांकावर आरुढ आहे. पण आता स्मिथ परतल्याने त्याच्या या स्थानाला आव्हान निर्माण झाले आहे. त्याच्यापूर्वी स्मिथच अव्वल स्थानी होता.