इंग्लंड आणि वेल्समध्ये ३० मे पासून रंगणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी आयसीसीने १६ पंच आणि ६ मॅच रेफ्रींची नियुक्ती केली आहे. यात भारताच्या एकमात्र पंचाचा समावेश आहे. ज्या भारतीय पंचाची आयसीसीने आगामी विश्वचषकासाठी निवड केली आहे, ते पंच सध्या सुरु असलेल्या आयपीएल स्पर्धेतील एका नो बॉलच्या निर्णयामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते.
आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यादरम्यान बंगळुरुला एका चेंडूत ७ धावांची आवश्यकता असताना त्य़ा सामन्यातील पंच सुंदरम रवी यांनी लसिथ मलिंगाने शिवम दुबेला टाकलेला चेंडू नो बॉल असतानाही योग्य ठरवला होता. पंचांनी हा चेंडू नो बॉल घोषित केला असता तर बंगळुराला केवळ एक चेंडूच नव्हे तर एक अतिरिक्त धाव आणि फ्री हिटही मिळाली असती. त्यामुळे सामन्याचा निकाल वेगळा लागू शकला असता.
या चुकीच्या निर्णयामुळे ते चांगलेच चर्चेत आले होते. यावेळी भारतीय विश्वचषक संघाचा कर्णधार आणि आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे नेतृत्व करणाऱ्या विराट कोहलीने देखील त्यांच्यावर टिका केली होती. या घटनेचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळावर कोणताही परिणाम झालेला नाही. एका निर्णयामुळे त्यांच्या कारकिर्दीवर प्रश्न चिन्ह उपस्थित करणे देखील योग्य ठरले नसते. त्यांची निवड होण्यामागे आणखी एक महत्त्वाचे कारण आहे. आयसीसीच्या एलिट पॅनेलमध्ये रवी हे एकमेव भारतीय पंच आहेत. म्हणजेच अनुभव आणि दर्जाने त्यांच्या तोडीचा अन्य कोणताही भारतीय पंच नाही.