विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ विश्वचषकासाठी लंडनमध्ये दाखल झाला आहे. भारतीय संघाचा या स्पर्धेतील पहिला सामना ५ जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. तत्पूर्वी भारतीय संघ दोन सराव सामने खेळणार आहे. भारतीय संघ न्यूझीलँडविरुद्ध २५ मे ला आपला पहिला सराव सामना खेळणार आहे. तर २८ मे रोजी भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध दुसरा सराव सामना खेळेल. विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला प्रबळ दावेदार मानले जात आहे.
विश्वचषकापूर्वी कर्णधार विराट कोहलीने स्पर्धा आव्हानात्मक असल्याचे म्हटले होते. यंदाच्या स्पर्धेत चांगले प्रतिस्पर्धी आहेत, असे विराट म्हणाला होता. भारतीय संघाने आतापर्यंत दोनवेळा विश्वचषक स्पर्धा जिंकली आहे. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली १८८३ मध्ये भारताने पहिल्यांदा विश्वचषकावर नाव कोरले होते.
त्यानंतर तब्बल २८ वर्षानंतर महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २०११ मध्ये दुसऱ्यांदा विश्वचषक पटकावला. यंदाच्या विश्वचषकात दमदार कामगिरी करुन विराट ब्रिगेड विश्वचषक घेऊन परतेल, असा भारतीय क्रिकेट चाहत्यांचा विश्वास आहे. भारतीय संघ हा विश्वास सार्थ ठरवणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.