पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हार्दिक म्हणतो, विश्वकरंडक स्पर्धेत माझे लक्ष असेल...

हार्दिक पांड्या

विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा ही मोठी संधी आहे. मी पहिल्यांदाच विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत खेळणार आहे. आत्मविश्वासाने सामन्यासाठी मैदानात उतरून समोर आलेला चेंडू योग्य दिशेने फटकावणे हेच माझे लक्ष असेल, असे क्रिकेटपटू हार्दिक पांड्या याने म्हटले आहे. पुढील महिन्याच्या अखेरिस इंग्लंडमध्ये सुरू होत असलेल्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झालेल्या भारतीय संघामध्ये हार्दिक पांड्याचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच त्याने आपले मत मांडले.

काही महिन्यांपूर्वी एका टीव्ही कार्यक्रमात महिलांबद्दल आक्षेपार्ह मत व्यक्त केल्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांच्यावर काही सामन्यांसाठी बंदी घातली होती. या दोघांवर त्यावेळी खूप टीकाही झाली होती. त्यांना ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून माघारी पाठविण्यात आले होते. त्यातच पुढे न्यूझीलंड दौऱ्यातून परत येताना हार्दिक पांड्याला पाठीच्या दुखण्याचा सामना करावा लागला होता. या सगळ्यातून बाहेर पडून सध्या सुरू असलेल्या इंडियन प्रिमिअर लीग अर्थात आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना हार्दिक पांड्याने चांगली कामगिरी केली. एकूण आठ सामन्यांमध्ये ४६.५० च्या सरासरीने त्याने १८६ धावा केल्या आहेत. संकटात सापडलेला मुंबई इंडियन्सचा संघ त्याच्या खेळण्यामुळे अनेकवेळा संकटातून बाहेर पडून विजयी ठरला आहे. 

हार्दिक पांड्या त्याच्या आक्रमक खेळीसाठी ओळखला जातो. तो म्हणतो, गेल्या चार वर्षांपासून माझी हीच ओळख आहे. संघामध्ये खेळताना माझी हीच भूमिका असते. नेटमध्ये सराव करतानाही मी त्याच पद्धतीने करतो. पण अनेकवेळा समोरची परिस्थिती बघून कसे खेळायचे हे ठरवावे लागते. जर तुम्ही स्मार्ट असाल, तर तुम्हाला लगेचच समजते की कसे खेळले पाहिजे. 

दोन वर्षांपूर्वी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने केलेली कामगिरी आणि सध्याचा तुल्यबळ भारतीय संघ या दोन्हीचा विचार करता भारतीय संघ यंदाचा विश्वकरंडक स्पर्धा जिकण्याची शक्यता अधिक असल्याचे हार्दिक पांड्याने म्हटले आहे. अर्थात तिथल्या खेळपट्ट्या, हवामान याची स्थिती काय असेल, हे बघावे लागेल, असेही त्याने म्हटले आहे.