दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात ऋषभ पंतला भारतीय संघात स्थान मिळालेले नाही. बर्थडे बॉयला २२ वाढदिवशी मैदानात उतरायला लागले नसले तरी त्याच्याकडे महेंद्रसिंह धोनीचा वारसा म्हणून पाहिले जाते. त्याच्याकडे खूप वेळही आहे. इथपर्यंत त्याचा प्रवास सहज आणि सोपा नव्हता. जाणून घेऊयात त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याच्या संघर्षाचा प्रवास
१९९७ मध्ये आजच्या दिवशी पंतचा जन्म उत्तराखंड येथील रुड़की येथे झाला. फारच कमी वयात त्याने भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या आणि बीसीसीआय निवड समितीला प्रभावीत केले. उत्तराखंडमध्ये क्रिकेट फारसे प्रगत नाही. त्यामुळे पंथने आपला मोर्चा दिल्लीला वळवला. शिखर धवन, आकाश चोप्रा, आशीष नेहरा, अतुल वासन, अजय शर्मा आणि अंजुम चोप्रा यांच्या मार्गदर्शनाखाली पंतने क्रिकेटमधील बारकावे आत्मसाद केले. तारक सिन्हा यांनी पंतच्या आयुष्यातील एक किस्सा शेअर केला आहे. त्यांच्या क्लबकडून एक टॅलेंट हंट टूर्नामेंटचे आयोजन केले जायचे. वयाच्या १२ व्या वर्षी या स्पर्धेत आपली क्षमता सिद्ध करण्यासाठी पंत आपल्या आईसोबत आला होता. ऋषभ पंतने १२ वर्षाखालील या स्पर्धेत ३ शतके झळकावली होती.
ऋषभ पंत जेव्हा रुड़कीहून दिल्लीला आला तेव्हा त्याच्यासमोर राहण्याची मोठी अडचण होती. परिणामी त्याला मोतीबाग येथील गुरुद्वारेमध्ये आश्रय घ्यावा लागला होता. येथील लंगरमध्ये तो जेवण देखील करायचा. त्याची आई गुरुद्धारामध्ये सेवा कार्य करायची. संघर्षमय प्रवासातून त्याने आता संघात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
राजस्थानमध्ये पदरी पडली होती निराशा
दिल्लीच्या स्थानिक क्रिकेट संघात स्थान मिळवण्यासाठी तगडी स्पर्धा होती. त्यामुळे प्रशिक्षक तारक सिन्हा यांनी ऋषभला राजस्थानकडून खेळण्याचा सल्ला दिला. गुरुच्या सांगण्यावरून पंत राजस्थानलाही गेला. राजस्थानकडून त्याने १४ वर्षांखालील आणि १६ वर्षाखालील स्पर्धेत सहभाग घेतला. परंतु प्रांतवादाच्या मुद्यावरुन त्याला संघातून दुर्लक्षित करण्यात आले. राजस्थानमधील निराश होऊन तो पुन्हा दिल्लीला परतला. स्थानिक क्रिकेटमधील सातत्यपूर्ण खेळीमुळे त्याला १९ वर्षांखालील भारतीय संघात स्थान मिळाले. राहुल द्रविडसारख्या दिग्गजाच्या मार्गदर्शनाखाली २०१६ मध्ये १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत पंतने तुफानी फटकेबाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या स्पर्धेत त्याने नेपाळ विरुद्ध १८ चेंडूत अर्धशतकी खेळी करण्याचा पराक्रम केला.
१९ वर्षांखालील विश्वचषकातील कामगिरी ठरली टर्निंग पाइंट
१९ वर्षांखालील भारतीय संघाने विश्वचषक गमावला मात्र पंतसारखा हिरा भारतीय संघाला मिळाला. २०१६ च्या आयपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स (तेव्हा दिल्ली डेअरडेविल्स) संघाने पंतसाठी १० लाखांच्या मूळ किंमतीसह खरेदी केले. तेव्हा पंत अवघ्या १८ वर्षांचा होता. तो या स्पर्धेत फारसा प्रभावी कामगिरी करु शकला नाही. मात्र त्याच्यातील आक्रमक शैलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. २०१७ च्या आयपीएल हंगामात पंतच्या स्फोटक फंलदाजीच्या नजराण्याने सर्वांना आश्चर्यचकित करुन सोडले. त्याने १४ सामन्यात २६.१४ च्या सरासरी आणि १६५.६१ च्या स्ट्राइक रेटने ३६६ धावा केल्या. यात २ अर्धशतकांचा समावेश होता. यात ९७ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती.