पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

खेळापेक्षा खासगी आयुष्याला मिळणाऱ्या अधिक महत्त्वामुळे दुती चिंतेत

दुती चंद

भारताची आघाडीची धावपटू दुती चंद हिनं काही दिवसांपूर्वी उघडपणे आपण समलैंगिक असल्याचं मान्य केलं होतं. संपूर्ण जगासमोर समलैंगिक असल्याचं मान्य करणारी दुती ही पहिलीच खेडाळू आहे. तिच्या धाडसाबद्दल जगभरातील प्रख्यात मंडळींनी तिचं कौतुक केलं. भारतासारख्या देशात आजही अनेक ठिकाणी समलैंगिक संबंध खुलपणानं मान्य केले नाहीत. या व्यक्तींबद्दल अनेक पूर्वग्रह लोकांच्या मनात आहे. अशावेळी  आपली जनतेच्या मनात असलेली प्रतिमा, लोक काय म्हणतील, आपल्याला जग स्वीकारेल की नाही याचा विचार न करता दुतीनं आपलं  सत्य  मोकळेपणानं मान्य केलं.

या गोष्टीला  आठवड्याभराचा अवधी उलटला असेन. हे सारं खुलेपणानं जगासमोर मान्य करणं नक्कीच सोप्प नव्हतं. 'पहिल्यांदा मला खूप भीती वाटत होती. मी  खूप  मोठा गुन्हा केला आहे ही भावना छळत होती. जो-तो मला दोष देत होता.' हिंदुस्थान टाइम्सशी बोलताना दुतीनं तिचं सत्य जगाला सांगण्यापूर्वी ती कोणत्या मानसिक तणावातून जात होती याचं वर्णन केलं.

 'मी समलैंगिक असल्याचं  कळताच लोक मला पूर्वीसारखा मान देणार नाही ही भीती मला सारखी वाटत होती. समलैंगिक नात्यांकडे लोक खूप वेगळ्या पद्धतीनं पाहतात. लोकांच्या मनात  आमच्याविषयी खूपच पूर्वग्रह असतात. हे चुकीचं आहे. पण काही लोक आमच्याबाजूनं खंबीरपणे उभे राहणारे देखील आहेत. जगात प्रत्येकजण प्रेम करतं.' दुती सांगत होती.

'मात्र सत्य खुलपणानं जगाला सांगितल्यानंतर माझ्या मनाला आता शांती लाभली आहे. मी गुन्हा केलाय आहे ही मनाला सतत छळणारी अपराधीपणाची भावना आता नाहीशी झालीये. मला माझं सत्य कधीना  कधी जगासमोर आणायचं होतंच. यामुळे माझे माझ्या कुटुंबीयांशी  मतभेद झाले आणि यातून वाद झाला' दुती म्हणाली. 

या सर्वामुळे  तिच्या खेळातील कामगीरीपेक्षा तिचं खासगी आयुष्य जास्त अधोरेखित झालं याचं तिला दु:ख आहे. मात्र आता दुतीला खेळातच लक्ष केंद्रीत करायचं आहे. २०२० मध्ये होणाऱ्या टोकिया ऑलिम्पिकवरच पूर्ण एकाग्रतेनं लक्ष देण्याचं तिनं ठरवलं आहे.  भविष्यात आपल्या समलैंगिक जोडीदारासोबत लग्न करण्याची इच्छाही तिनं या मुलाखतीत बोलून दाखवली. समाजातले  काही  लोक आहेत ते माझ्याविषयी नकारात्मक बोलतीलही मात्र मला याक्षणी माझा  खेळ महत्त्वाचा आहे असा निर्धार तिनं बोलून दाखवला.