भारतीय क्रिकेट मंडळाने (बीसीसीआय) क्रिकेटच्या मैदानात लक्षवेधी कामगिरी करणाऱ्या चार खेळाडूंची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली आहे. यात महिला फिरकीपटूसह विश्वचषकात स्थान मिळालेल्या पुरुष संघातील तीन खेळाडूंचा समावेश आहे. महिला क्रिकेटर पुनम यादव, जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांच्यासह अष्टपैलू रविंद्र जडेजाचा यात समावेश आहे.
सर्वोच्च न्यायालयाद्वारे नियुक्त केलेल्या प्रशासकिय समितीचे सदस्य (सीईओ) आणि भारतीय क्रिकेट मंडळाचे अधिकारी यांच्यात शनिवारी नवी दिल्ली येथे अर्जुन पुरस्कारासंदर्भातील नामांकनाबद्दल चर्चा झाली. त्यानंतर बीसीसीआयने आज चार नावे घोषित केली आहेत. अर्जुन पुरस्कारासाठी खेळाडूंच्या नावाची शिफारशीसोबतच महिला संघाच्या प्रशिक्षक निवडीबद्दल देखील यावेळी चर्चा करण्यात आली. यासंदर्भात लवकरच प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे.
पुनम यादव
२७ वर्षीय पुनम यादव महिला क्रिकट संघाची सदस्य आहे. या आपल्या फिरकीच्या जादूने तिने अनेक सामन्यात भारताला यश मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. महिला क्रिकेट क्रमवारीत पुनम यादव गोलंदाजीमध्ये दहाव्या स्थानावर आहे. तिने आतापर्यंत ४१ एकदिवसीय आणि ५४ टी-२० सामन्यात भारतीय महिला संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे.
जसप्रीत बुमराह
जसप्रीत बुमराहने सध्याच्या घडीला भारतीय गोलंदाजीचा प्रमुख अस्त्र अशी ओळख निर्माण केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून तो सातत्यपूर्ण गोलंदाजीची मदार यशस्वीरित्या सांभाळत आहे. बुमराह आयसीसी क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे. एवढेच नाही तर कसोटी आणि टी-२० क्रिकेट संघातील तो प्रमुख सदस्य आहे. आगामी विश्वचषकात त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत
मोहम्मद शमी
एका बाजूने बुमरा आणि दुसऱ्या बाजूने शमीचा मारा हे चित्र गेल्या काही दिवसांपासून भारतीय गोलंदाजी आक्रमणामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत मोहम्मद शमी जरी ३४ व्या स्थानावर असला तरी शमीने विश्वसनीय गोलंदाज म्हणून आपली छाप उमटवली आहे. त्याने भारताकडून ६३ एकदिवसीय सामन्यात ११३ बळी मिळवले आहेत. तर कसोटीमध्ये ४० सामन्यात १४४ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला आहे.
रविंद्र जडेजा
रविंद्र जडेजा आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत अष्टपैलूच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत गेल्या सहा महिन्यात त्याने एकदिवसीय सामन्यातही आपल्यातील क्षमता दाखवून दिली आहे. त्याने ४१ कसोटी १५१ एकदिवसीय आणि ४० टी-२० सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे.