पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अजिंक्यचा इंग्लंडच्या मैदानात खेळण्याचा मार्ग मोकळा

अजिंक्य रहाणे

इंग्लंड आणि वेल्समध्ये रंगणाऱ्या विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान मिळवण्यात अपयशी ठरलेला अजिंक्य रहाणे आता इंग्लंडमध्ये लोकप्रिय असलेल्या काऊंटी क्रिकेटच्या मैदानात उतरणार आहे. तो या स्पर्धेत हॅम्पशायर क्रिकेट क्लबचे प्रतिनिधीत्व करेल. काऊंटी क्रिकेट खेळण्यासंदर्भात अजिंक्यने काही दिवसांपूर्वी बीसीसीआयकडे परवानगी मागितली होती. बीसीसीआयने त्याला परवानगी दिल्यानंतर हॅम्पशायर क्रिकेट क्लबने अजिंक्यसोबत आगामी हंगामासाठी करार केला आहे.

त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन अजिंक्य रहाणे आपल्यासोबत करारबद्ध झाल्याची घोषणा केली आहे. याशिवाय काऊंटी क्रिकेट खेळण्यास परवानगी दिल्याबद्दल अजिंक्यनेही भारतीय क्रिकेट मंडळ (बीसीसीआय) चे आभार मानले आहेत. अजिंक्य हॅम्पशायर संघाकडून खेळणारा पहिला भारतीय खेळाडू असेल. दक्षिण आफ्रिकेचा डावखुरा फलंदाज एडन मार्क्रमच्या जागी रहाणेला संघात जागा मिळाली आहे. मे, जून आणि जूलैमध्ये रंगणाऱ्या हंगामात आपल्यातील क्षमता दाखवण्यासाठी अजिंक्यही उत्सुक आहे. 

इंग्लंडमधील परिस्थितीत चांगली कामगिरी करण्यासाठी अनेक खेळाडू कांऊटी क्रिकेटला प्राधान्य देण्याचा ट्रेंड आपल्याला पाहायला मिळत आहे. यापूर्वी भारताचा जलदगती गोलंदाज इशांत शर्मा हा ससेक्स संघाकडून काऊंटी क्रिकेटच्या मैदानात उतरला होता. याशिवाय मुरली विजयने एसेक्स आणि इंग्लंड दौऱ्याला जाण्यापूर्वी भारताचा कर्णधार विराट कोहलीने सरे या संघातून खेळल्याचे पाहायला मिळाले होते.