पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

IND vs SA 1st Test : अशी असेल विराटची टीम इलेव्हन

भारतीय संघ

India vs South Africa,  1st Test at Visakhapatnam: दक्षिण अफ्रिका आणि भारत यांच्यातील कसोटी मालिका अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. विशाखापट्टणमच्या मैदानातून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. सराव सामन्यात शून्यावर बाद झालेल्या रोहित शर्मासाठी दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका खऱ्या अर्थाने कसोटी असणार आहे. युवा सलामीवीर मंयक अग्रवालसोबत तो भारताच्या डावाची सुरुवात करेल.   

सलामीवीर : मयंक अग्रवाल आणि रोहित शर्मा
आपल्या पहिल्या चार कसोटी सामन्यात तीन अर्धशतके झळकवणाऱ्या युवा सलामीवीर मंयक अग्रवाल रोहित शर्मासोबतत भारताच्या डावाला सुरुवात करेल. त्याने ७ डावात  ७६, ७७ आणि ५५ धावांची खेळी केली होती. रोहित शर्माला लोकेश राहुलला बाकावर बसवून सलामीवीर म्हणून संघात स्थान मिळाले आहे. आफ्रिकेविरुद्ध चांगली कामगिरी करुन कसोटीतील आपले स्थान पक्के करण्याची त्याच्यासमोर कसोटी असेल. 

मध्यफळीतील फलंदाज 
चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अंजिक्य रहाणे आणि हनुमा विहारी यांच्यावर मध्यफळीची जबाबदारी असेल. 
विंडीज दौऱ्यावर पुजाराला नावाला साजेसा खेळ करण्यात अपयश आले होते. चार डावात त्याने केवळ २७ धावा केल्या होत्या. रहाणे आणि विहारी यांनी विंडीज दौऱ्यावर दमदार कामगिरी केली होती. विहारीने विंडीज विरुद्ध ३२, ९३, १११ आणि नाबाद ५३ धावांची खेळी करत मालिकावीरचा पुरस्कार पटकवला होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा असेल.  

यष्टिरक्षक ऋषभ पंत
यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत अपेक्षेप्रमाणे कामगिरी करण्यात अपयशी ठरला आहे. पण संघ व्यवस्थापन त्याला आणखी संधी देण्याची शक्यता आहे. भारताकडे ३५ वर्षीय वृद्धिमान साहाच्या रुपात पर्याय उपलब्ध आहे. पण त्याने देखील मागील पाच सामन्यात एकही अर्धशतकी खेळी केलेली नाही. निवड समिती सध्या युवा खेळाडूंना पहिली पसंती देत आहे. त्यामुळे पंतच आफ्रिकेविरुद्ध मैदानात उतरण्याची शक्यता आहे.  

अष्टपैलू : रविंद्र जडेजा
रविंद्र जडेजाने मिळालेल्या संधीच नेहमीच सोनं करुन दाखवले आहे. विश्वचषक भारताची फलंदाजी कोलमडल्यानंतर धोनीसोबत त्याने विजयाच्या आशा पल्लवित केल्या होत्या. विंडीजमध्येही त्याने लक्षवेधी कामगिरी केली आहे. त्यामुळे त्यालाही संघात स्थान मिळाले तर नवल वाटण्याचे कारण नाही. 

प्रमुख गोलंदाज
बुमराहने दुखापतीने माघार घेतल्यामुळे उमेश यादवला संघात स्थान मिळाले. मात्र भारतीय संघात ईशांत शर्मा आणि मोहम्मद शमीच पहिली पसंती मिळेल. याशिवाय अश्विनला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे.  
संभाव्य टीम इलेव्हन : मयंक अग्रवाल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title::india vs south africa 1st test match dream11 team india predicted playing xi at visakhapatnam rohit sharma as opener ashwin ishant sharma and mohammed shami