Steve Smith test record : लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ऍशेस मालिकेतील दुसरी कसोटी खेळली जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत आहे. यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथने इतिहास रचला आहे.
वास्तविक, स्टीव्ह स्मिथच्या नावावर आता कसोटी क्रिकेटमध्ये ९ हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद ९ हजार धावा पूर्ण करणारा तो जगातील दुसरा फलंदाज ठरला आहे. स्मिथने हा पराक्रम केवळ १७४ व्या डावात केला.
फॅब फोरमधील खेळाडू जो रुट आणि विराट कोहलीलाही अशी कामगिरी करता आलेली नाही. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने ९ हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम श्रीलंकेच्या कुमार संघकाराच्या नावावर आहे. त्याने १७२ कसोटी डावात ९ हजार धावा पूर्ण केल्या होत्या. संघकारानंतर स्टीव्ह स्मिथ १७४ डावात ९ हजार धावा पूर्ण करणारा फलंदाज ठरला आहे.
कसोटीत सर्वात वेगाने ९ हजार धावा पूर्ण करणाऱ्या फलंदाजात तिसऱ्या क्रमांकावर भारताचा राहुल द्रविड आहे. द्रविडने १७६ कसोटी डावात ९ हजार धावा पूर्ण केल्या होत्या.
कुमार संगकारा (श्रीलंका) - १७२ डावात
स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया) - १७४ डावात
राहुल द्रविड (भारत) - १७६ डावात
ब्रायन लारा (वेस्ट इंडिज) - १७७ डावात
रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया) - १७७ डावात
अॅशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठा बदल केला आहे. कांगारू संघाने स्कॉट बोलँडच्या जागी मिचेल स्टार्कचा संघात समावेश केला आहे. दुखापतीमुळे स्टार्क पहिल्या कसोटीत संघाचा भाग नव्हता. स्टार्कच्या आगमनाने ऑस्ट्रेलियाचे गोलंदाजी आक्रमण खूपच मजबूत दिसत आहे.
इंग्लंडनेही आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केला आहे. दुखापतग्रस्त मोईन अलीच्या जागी कर्णधार बेन स्टोक्सने २५ वर्षीय वेगवान गोलंदाज जोश टँगचा संघात समावेश केला आहे. टंगने यावर्षी आयर्लंडविरुद्ध कसोटी पदार्पणातच ५ विकेट्स आपल्या नावावर केल्या होत्या. अॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा पराभव झाला होता.
संबंधित बातम्या