मराठी बातम्या  /  क्रीडा  /  SRH vs LSG IPL : हैदराबादमध्ये निकोलस पूरनचं वादळ, SRH चा धुव्वा उडवत लखनौ टॉप-४ मध्ये

SRH vs LSG IPL : हैदराबादमध्ये निकोलस पूरनचं वादळ, SRH चा धुव्वा उडवत लखनौ टॉप-४ मध्ये

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
May 13, 2023 07:33 PM IST

SRH Vs LSG IPL 2023 Highlights : आयपीएलच्या ५८व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने सनरायझर्स हैदराबादचा ७ गडी राखून पराभव केला. हैदराबादमध्ये झालेल्या सामन्यात यजमान संघाने लखनौला १८३ धावांचे लक्ष्य दिले होते, जे लखनौने अखेरच्या षटकात पूर्ण केले.

SRH Vs LSG IPL 2023 Highlights
SRH Vs LSG IPL 2023 Highlights

SRH vs LSG 2023 Highlights : इंडियन प्रीमियर लीगच्या ५८व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स (LSG) ने सनरायझर्स हैदराबाद (SRH) चा ७ गडी राखून पराभव केला. हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर १३ मे (शनिवार) रोजी खेळल्या गेलेल्या या सामन्यात यजमान संघाने लखनौ सुपरजायंट्सला १८३ धावांचे लक्ष्य दिले होते, जे त्यांनी शेवटच्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर गाठले.

लखनौच्या विजयात कॅरेबियन फलंदाज निकोलस पूरनने महत्त्वाची भूमिका बजावली. पुरणने केवळ १३ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ४४ धावा ठोकल्या. प्रेरक मंकडनेही ४५ चेंडूत ६४ धावांची शानदार खेळी केली. मंकडने आपल्या खेळीत सात चौकार आणि दोन षटकार मारले. याशिवाय स्टॉइनिसने ४० आणि क्विंटन डिकॉकने २९ धावांचे योगदान दिले.

अभिषेक शर्माच्या षटकात सामना फिरला

सामन्याचा टर्निंग पॉइंट अभिषेक शर्माचे षटक (१६वे) ठरले, ज्यामध्ये मार्कस स्टॉइनिस आणि निकोलस पूरन यांनी एकूण पाच षटकार ठोकले. त्या षटकाने सामना पूर्णपणे लखनौच्या बाजूने वळवला. या विजयासह लखनौ सुपर जायंट्सचा संघ गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आला आहे.

हैदराबादचा डाव

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने २० षटकांत ६ गडी गमावून १८२ धावा केल्या. सलामीवीर अभिषेक शर्मा काही विशेष करू शकला नाही आणि केवळ सात धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर अनमोलप्रीत सिंग आणि राहुल त्रिपाठी यांनी दुसऱ्या विकेटसाठी ३७ धावांची भागीदारी केली.

त्रिपाठी १३ चेंडूंत चार चौकारांच्या मदतीने २० धावा करून बाद झाला. यानंतर अनमोलप्रीतने कर्णधार एडन मार्करामसोबत तिसऱ्या विकेटसाठी २६ धावांची भागीदारी केली. अनमोलप्रीत २७ चेंडूंत सात चौकारांच्या मदतीने ३६ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. क्रुणाल पांड्याने १३व्या षटकात लागोपाठ दोन चेंडूंवर एडन मार्कराम आणि ग्लेन फिलिप्सला बाद केले. मार्कराम २० चेंडूत २ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने २८ धावा करून बाद झाला, तर फिलिप्सला खातेही उघडता आले नाही.

यानंतर हेनरिक क्लासेनने अब्दुल समदसोबत सहाव्या विकेटसाठी ५८ धावांची भागीदारी केली. मोठा फटका मारण्याच्या नादात क्लासेनने आपली विकेट गमावली. त्याचे अर्धशतक ३ धावांनी हुकले आणि तो २९ चेंडूंत तीन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ४७ धावा करून बाद झाला. अब्दुल समदने २५ चेंडूत एक चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने नाबाद ३७ धावा केल्या. भुवनेश्वर कुमार दोन धावा करून नाबाद राहिला.

WhatsApp channel