DC vs SRH Highlights, Indian Premier League (IPL) 2023 : आयपीएल 2023 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा आणखी एक पराभव झाला आहे. २९ एप्रिल (शनिवार) रोजी झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा सनरायझर्स हैदराबादने ९ धावांनी पराभव केला. सनरायझर्स हैदराबादचा चालू मोसमातील हा तिसरा विजय ठरला. हेन्रिक क्लासेन आणि अभिषेक शर्मा यांनी सनरायझर्सच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
१९८ धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात खूपच खराब झाली आणि डावाच्या दुसऱ्या चेंडूवर कर्णधार डेव्हिड वॉर्नरची विकेट गमावली. वॉर्नरला भुवनेश्वर कुमारने बोल्ड केले आणि त्याला खातेही उघडता आले नाही. यानंतर फिल सॉल्ट आणि मिचेल मार्श यांच्यात दुस-या विकेटसाठी ११२ धावांची भागीदारी झाली, ज्यामुळे दिल्लीला सामन्यात पुनरागमन करता आले.
इंग्लिश क्रिकेटपटू सॉल्टने आपल्या आयपीएल कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावत ५९ धावांची खेळी केली. यादरम्यान सॉल्टने ३५ चेंडूंचा सामना करत ९ चौकार मारले. मयंक मार्कंडेने फिल सॉल्टला झेलबाद करून ही भागीदारी संपुष्टात आणली. सॉल्ट बाद झाल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने ठराविक अंतराने विकेट गमावल्या.
मनीष पांडेला अभिषेक शर्माने यष्टिचित केले. त्यानंतर अकील हुसेनने मिचेल मार्शची मोठी विकेट घेतली. मिशेलने ३९ चेंडूंचा सामना करत ६३ धावा केल्या, ज्यात ६ षटकार आणि एक चौकार समाविष्ट आहे. मार्शची विकेट पडल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सचा डाव पुन्हा रुळावर येऊ शकला नाही.
दिल्लीला विजयासाठी शेवटच्या षटकात २६ धावा करायच्या होत्या, पण भुवनेश्वर कुमारने अक्षर पटेल आणि रिपल पटेलला या धावा करू दिल्या नाहीत.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादने सहा गड्यांच्या मोबदल्यात १९७ धावा केल्या. २२ वर्षीय युवा खेळाडू अभिषेक शर्माने ३६ चेंडूंत ६७ धावांची खेळी खेळली, ज्यात १२ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. त्याचवेळी, हेनरिक क्लासेनने २७ चेंडूंचा सामना करत नाबाद ५३ धावा केल्या. क्लासेनच्या खेळीत दोन चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता.
अब्दुल समद (२८ धावा) आणि अकील हुसेन (नाबाद १६) यांनीही सनरायझर्स हैदराबादसाठी उपयुक्त योगदान दिले. मिचेल मार्शने दिल्ली कॅपिटल्सकडून सर्वाधिक ४ खेळाडूंना बाद केले. त्याचवेळी इशांत शर्मा आणि अक्षर पटेल यांना प्रत्येकी एक विकेट मिळाला.