मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Hockey WC 2024 : हॉकी विश्वचषकासाठी भारताचे पुरुष आणि महिला संघ जाहीर, सिमरनजीत आणि रजनी कर्णधारपदी

Hockey WC 2024 : हॉकी विश्वचषकासाठी भारताचे पुरुष आणि महिला संघ जाहीर, सिमरनजीत आणि रजनी कर्णधारपदी

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Dec 31, 2023 11:02 PM IST

Hockey World Cup 2024, Indian Mens and Womens Squad : महिला संघ २४ ते २७ जानेवारी दरम्यान या स्पर्धेतील आपले सामने खेळणार आहे, तर पुरुष संघ २८ जानेवारीपासून आपल्या वर्ल्डकप मोहिमेला सुरुवात करेल.

Hockey World Cup 2024
Hockey World Cup 2024

Hockey World Cup 2024 : ओमानमधील मस्कत येथे होणाऱ्या FIH हॉकी फाइव्ह विश्वचषक स्पर्धेसाठी भारताच्या पुरुष आणि महिला संघांची आज (३१ डिसेंबर) घोषणा करण्यात आली आहे. पुरुष संघाची कमान सिमरनजीत सिंग याच्याकडे सोपवण्यात आली आहे. तर महिला संघाचे नेतृत्व रजनी इतिमारपूकडे सोपवण्यात आले आहे.

महिला संघ २४ ते २७ जानेवारी दरम्यान या स्पर्धेतील आपले सामने खेळणार आहे, तर पुरुष संघ २८ जानेवारीपासून आपल्या वर्ल्डकप मोहिमेला सुरुवात करेल.

पुरुष संघाची कमान सिमरनजीतच्या हाती

ओमानच्या भूमीवर होणाऱ्या या विश्वचषकासाठी पुरुष संघाची कमान फॉरवर्ड खेळाडू सिमरनजीत सिंगकडे सोपवण्यात आली आहे. तर बचावपटू मनदीपची उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

सूरज आणि प्रशांत चौहानच्या रूपाने दोन गोलरक्षकांचा संघात समावेश करण्यात आला आहे. मनदीप आणि मनजीतला बचावपटू म्हणून संघात स्थान मिळाले आहे.

राहिल मौसीन आणि मनिंदर सिंग मिडफिल्डरच्या भूमिकेत दिसणार आहेत. पवन, गुरजोत सिंग, सिमरनजीत आणि उत्तम सिंग यांना फॉरवर्ड खेळाडू म्हणून संघात स्थान देण्यात आले आहे.

रजनी इतिमारपू महिला संघाची कर्णधार

रजनी इतिमारपू हॉकी विश्वचषकात भारतीय महिला संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. महिमा चौधरीला संघाची उपकर्णधार बनवण्यात आली आहे. अजमीना कुजूर, ऋताजा, दीपिका सौरंग यांचा फॉरवर्ड खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे.

महिमा, ज्योती आणि अक्षता यांना बचावपटूच्या भूमिकेत ठेवण्यात आले आहे. भारतीय महिला संघाला क गटात स्थान देण्यात आले असून स्पर्धेत त्यांचा सामना नामिबिया, पोलंड आणि अमेरिकेशी होणार आहे.

पुरुष संघ पूल-बी मध्ये, या संघांना भिडणार

भारतीय पुरुष हॉकी संघाला विश्वचषक २०२४ मध्ये पूल-बी मध्ये स्थान देण्यात आले आहे. भारतीय पुरुष हॉकी संघाला ग्रुप स्टेजमध्ये इजिप्त, जमैका आणि स्वित्झर्लंडचा सामना करावा लागणार आहे.

नेदरलँड, पाकिस्तान, पोलंड आणि नायजेरिया यांना पूल-ए मध्ये स्थान देण्यात आले आहे, तर मलेशिया, फिजी, ओमान, अमेरिका यांचा समावेश पूल-डीमध्ये करण्यात आला आहे.

ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, त्रिनिदाद आणि केनिया या संघांना सी गटात ठेवण्यात आले आहे.

WhatsApp channel

विभाग