भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली आता उद्योग क्षेत्रात हात आजमावणार आहे. तो आता एका उद्योगात गुंतवणूक करणार असल्याची माहिती मिळत आहे. सौरवने शुक्रवारी बंगालमधील शालबनी येथे कारखाना सुरू करण्याची घोषणा केली.
गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या स्पेन दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्र्यांसोबतच्या या शिष्टमंडळात सौरव गांगुलीदेखील सामील आहे. या प्रसंगीच गांगुलीने स्पेनमध्ये ही घोषणा केली. एका बंगाली वृत्तवाहिनीशी बोलताना सौरव म्हणाला की, मी शालबनी कारखान्यात २,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
सुरुवातीच्या टप्प्यात यातून सुमारे ६ हजार रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. त्याचे काम सहा महिन्यांत सुरू होईल, असे सौरव गांगुलीने सांगितले. या कारखान्यासाठी बंगाल सरकार शालबनी येथे जमीन उपलब्ध करून देणार आहे.
गांगुली हा जगातील महान फलंदाजांपैकी एक म्हणून ओळखला जायचा. त्याने ११३ कसोटीत १६ शतकांसह ७२१२ धावा केल्या. एकदिवसीय क्रिकेटमध्ये, गांगुलीने ३११ सामने खेळले आणि २२ शतकांसह ११ हजार ३६३ धावा केल्या. सचिन तेंडुलकरसोबत त्याने सलामीला येत ८२२७ धावा जोडल्या.
गांगुलीने ११३ कसोटी सामन्यांमध्ये ३२ बळी घेतले. सोबतच ३११ एकदिवसीय सामन्यांमध्ये १०० विकेट्स घेतले. याशिवाय, कर्णधार म्हणून, गांगुलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये १९५ सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आणि ९७ सामने जिंकले.
गांगुलीने शेवटचा वनडे १५ नोव्हेंबर २००७ रोजी ग्वाल्हेर येथे खेळला. त्याने शेवटची कसोटी ६ नोव्हेंबर २००८ रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध नागपूर येथे खेळली. यानंतर काही वर्षे तो इंडियन प्रीमियर लीग (ipl) मध्ये खेळत राहिला, गांगुलीने मे २०१२ मध्ये देशांतर्गत क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली.