Success Story: मुंबईतील मालाड येथील मालवणी परिसरात राहणाऱ्या १६ वर्षाच्या मुलाने आपल्या आई-वडिलांचे नाव काढले आहे. असद शहा असे या मुलाचे नाव असून त्याने १७ वर्षांखालील राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे, ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे. घरची परिस्थिती हलाखीची असताना त्याने जिद्द सोडली नाही. संपूर्ण महाराष्ट्रातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षावर होत आहे.
महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारा आणि दिल्लीचा दावेदार मुकुल लाबेला पराभूत करून ४०० हून अधिक स्पर्धकांमध्ये विजेतेपद पटकावणारा शहा म्हणाला की, 'मी माझ्या मित्रांचा आणि प्रशिक्षकाचा आभारी आहे, ज्यांनी माझ्यासाठी खूप मेहनत घेतली. स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया या स्वयंसेवी संस्थेने आयोजित केलेल्या या स्पर्धेचे आयोजन दिल्लीत करण्यात आले होते.
शहा यांना किशोरवयातच त्यांच्या शेजारच्या आणि शाळेतील मित्रांनी बॉक्सिंगची ओळख करून दिली. मालाडच्या आयडियल इंग्लिश स्कूलमध्ये प्रशिक्षक असलेल्या कृष्णा सोनी यांनी शहा याच्या खेळातील कौशल्याची दखल घेतली. सोनी यांनी स्वत: शहा याला कांदिवलीतील जिम-कम-ट्रेनिंग सेंटरमध्ये पाच वर्षे मोफत प्रशिक्षण दिले. शहाचे वडील एका कॉर्पोरेट कंपनीत हेल्पर म्हणून काम करतात. तर, त्याची आई गृहिणी आहे. घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे त्यांना शहाला एक बॉक्सिंग किट देखील घेऊन देता आले नाही.
शहा याच्या कुटुंबाची आर्थिक परस्थिती फार नाजूक होती. शहाचा मालवणी ते कांदिवली असा दैनंदिन प्रवासाचा खर्च देखील त्यांना परवडत नव्हता. 'बॉक्सिंगची आवड असल्याने शहा आणि त्याचे १२ मित्र रोज पाच किलोमीटर पायी चालत ये-जा करायचे. प्रशिक्षकांनी बॉक्सिंग स्पर्धांसाठी बेसिक किट आणि प्रवेश शुल्कही उपलब्ध करून दिले, तर काही वेळा मित्र- मैत्रिणी त्याला मदत करत असे.
सध्या कांदिवलीच्या केईएस कनिष्ठ महाविद्यालयात प्रथम वर्षाचा विद्यार्थी असलेला शहा गेल्या दोन वर्षांपासून बेंगळुरू येथे वास्तव्यास असून तो भारतीय क्रीडा संस्थेत (आयआयएस) राष्ट्रीय स्पर्धांचे प्रशिक्षण घेत आहे. दर दोन महिन्यांनी परीक्षा देण्यासाठी आणि वर्गात सहभागी होण्यासाठी तो मुंबईला येतो.
सुरुवातीच्या वर्षांच्या तुलनेत अडचणी तुलनेने कमी असल्या तरी प्रशिक्षण आणि अभ्यास यांचा समतोल राखणे खूप अवघड काम आहे, असे शहा म्हणाला. पण शाळा आणि महाविद्यालयाने त्याला पाठिंबा दिला आहे. 'मला देशाचा अभिमान वाढवायचा आहे आणि प्रत्येकाची स्वप्ने पूर्ण करायची आहेत.
संबंधित बातम्या