भारताची तिरंदाज शीतल देवी हिने पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये आतापर्यंत अप्रतिम कामगिरी केली आहे. तिने महिलांच्या वैयक्तिक कंपाउंड ओपनर रँकिंग फेरीत चमकदार कामगिरी केली आणि दुसरे स्थान मिळविले. विशेष म्हणजे तिरंदाज शीतल देवीला दोन्ही हात नाहीत. अशाही स्थितीत तिने खूपच प्रभावी कामगिरी केली.
पण वैयक्तिक विश्वविक्रम करण्यापासून ती फक्त एका स्थानाने मागे राहिली. दरम्यान, तुम्ही कधी विचार केला आहे का की हात नसलेली शीतल देवी अर्जुनासारखा अचूक निशाणा कसा काय लावू शकते?
शीतल देवी धनुर्विद्या करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की हात नसलेली शीतल प्रथम तिच्या पायांनी बाण उचलते आणि नंतर धनुष्याला लावते. मग खांदाच्या साहाय्याने ती बाण ओढते आणि निशाणा लावते. पायाने तिरंदाजी करणारी शितल देवी अचूक निशाणा लावते. शीतला हा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
दरम्यान, शीतलचा जन्मच दोन्ही हातांशिवाय झाला होता. वास्तविक शीतल देवी फोकोमेलिया नावाच्या आजारासोबत जन्माला आली होती. या आजारात अवयव पूर्णपणे विकसित होत नाहीत. शीतलच्या बाबतीतही असेच घडले. तिचे दोन्ही हात विकसित होऊ शकले नाहीत.
मात्र, एवढा आजार असतानाही शीतलची जिद्द कायम राहिली आणि तिने तिरंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हाताने खेळायचा खेळ आपल्या पायांनी खेळून शीतलने संपूर्ण जगाला चकित केले.
विशेष म्हणजे, पॅरिस पॅरालिम्पिकच्या कंपाउंड तिरंदाजीच्या रँकिंग फेरीत शीतल देवीने ७०३ गुण मिळवले. या स्कोअरसह तिने विश्वविक्रम केला. यापूर्वी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये ब्रिटनच्या स्टेटन जेसिकाने ६९४ गुणांसह पॅरालिम्पिक विक्रम केला होता. तथापि, शीतलचा विश्वविक्रम फार काळ टिकला नाही आणि तुर्कीच्या ओझनूर गिरडी कुरेने ७०४ गुणांसह बाजी मारली.
शीतल दुसऱ्या स्थानावर राहिली. ती मिश्र सांघिक स्पर्धेसाठी पात्र ठरली. मिश्र संघात राकेश कुमारसह तिने विश्वविक्रम केला. मिश्र सांघिक स्पर्धांसाठी, सर्व देशांतील अव्वल पुरुष आणि महिला खेळाडूंचे गुण जोडले जातात. भारताकडून शीतल देवी आणि राकेश कुमार अव्वल राहिले. दोघांची एकूण गुणसंख्या १३९९ होती, जो विश्वविक्रम ठरला.