shaheen afridi breaks bat : पाकिस्तान सुपर लीगमध्ये (PSL 2023) शाहीन आफ्रिदीच्या लाहोर कलंदर आणि बाबर आझमच्या पेशावर झल्मी यांच्यात सामना झाला. या सामन्या लाहोर संघाचा कर्णधार शाहीन आफ्रिदीने चमकदार गोलंदाजी केली. या सामन्यात आफ्रिदीने ४ षटकात ४० धावा देत पेशावर झल्मीच्या अर्ध्या संघाला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला होता.
या दरम्यान, शाहीनने त्याच्या चेंडूच्या वेगाने फलंदाजाची बॅट तोडली आणि त्यानंतर पुढच्या चेंडूवर त्याने स्टंपही उडवले. या प्रसंगाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
खरं तर, या सामन्यात, जेव्हा पेशावर झल्मीचा संघ २४२ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला तेव्हा शाहीन आफ्रिदीच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर पेशावरचा सलामीवीर मोहम्मद हॅरिसने समोरच्या दिशेने शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, त्यादरम्यान त्याची बॅट तुटली. यानंतर पुढच्याच चेंडूवर शाहीनने हॅरिसला बोल्ड करून स्टंपदेखील हवेत उडवले. शाहीनने एका अप्रतिम चेंडूवर पेशावरचा कर्णधार बाबर आझमचीही दांडी गुल केली.
या सामन्यात शाहीनने पेशावर झल्मीच्या ५ फलंदाजांची शिकार केली. लाहोर कलंदरच्या संघाने हा सामना ४० धावांनी जिंकला. हा त्यांचा या मोसमातील तिसरा विजय आहे.
फखर जमान आणि असद शफीक यांची अप्रतिम फलंदाजी
तत्पूर्वी, या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना लाहोर कलंदर संघाने २० षटकात ३ गडी गमावून २४१ धावा ठोकल्या होत्या. अवघ्या ७ धावांवर संघाची पहिली विकेट पडली, त्यानंतर फखर जमान आणि असद शफीक यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी १२० धावांची भागीदारी पाहायला मिळाली. असदने या सामन्यात ४१ चेंडूत ५ चौकार आणि ५ षटकारांसह ७५ धावांची खेळी केली.
त्याचवेळी, फखर जमानने अवघ्या ४५ चेंडूत ९६ चोपल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून १० षटकारांचा पाऊस पडला.
संबंधित बातम्या