मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Sanju Samson: अशा गोष्टी घडतात तेव्हा... वर्ल्डकप संघातून डच्चू; संजूनं पहिल्यांदाच तोंड उघडलं

Sanju Samson: अशा गोष्टी घडतात तेव्हा... वर्ल्डकप संघातून डच्चू; संजूनं पहिल्यांदाच तोंड उघडलं

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Sep 22, 2022 11:34 AM IST

Sanju Samson T20 World Cup: २७ वर्षीय संजू सॅमसनने भारतासाठी आतापर्यंत ७ एकदिवसीय आणि १६ टी-20 सामने खेळले आहेत. T20 विश्वचषकासाठी भारतीय संघात त्याची निवड झाली नाही. यावर संजूने पहिल्यांदाच जाहीर प्रतिक्रिया दिली आहे.

Sanju Samson
Sanju Samson

T20 विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे. संजू सॅमसनला संघात न घेतल्याने भारतीय संघ व्यवस्थापन आणि निवडकर्त्यांवर सोशल मीडियावर जोरदार टीका झाली. आता सॅमसनने या संपूर्ण प्रकरणावर प्रथमच वक्तव्य केले आहे.

सॅमसनचा असा विश्वास आहे की गेल्या काही वर्षांत त्याने स्वत: ला अशा प्रकारे तयार केले आहे, की कोणीही त्याला वन-डायमेंशनल क्रिकेटर म्हणणार नाही. भारतीय क्रिकेटची गुणवत्ता दिवसेंदिवस वाढत असल्याने राष्ट्रीय संघात स्थान मिळवणे आता पूर्वीपेक्षा अधिक आव्हानात्मक असल्याचे सॅमसनचे मत आहे.

संजू सॅमसन काय म्हणाला

सॅमसन म्हणाला की, “मी वेगवेगळ्या भूमिका साकारण्याचा प्रयत्न करत आहे. मी अनेक वर्षे यावर काम केले आहे. मला खात्री आहे की मी कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. सॅमसनचा विश्वास आहे की यशस्वी होण्यासाठी तुम्ही सर्व प्रकारच्या भूमिका निभावल्या पाहिजेत. तुम्ही लोकांना सांगू शकत नाही की 'मी सलामीवीर आहे किंवा मी फिनिशर आहे.' गेल्या तीन-चार वर्षांत वेगवेगळ्या भूमिका आणि क्रमांकावर खेळल्यामुळे मला माझा खेळ अधिक सुधारण्यास मदत झाली आहे”.

२७ वर्षीय सॅमसनने भारतासाठी आतापर्यंत ७ एकदिवसीय आणि १६ टी-20 सामने खेळले आहेत. तो म्हणाला की, “भारतीय संघात स्थान मिळविणे आव्हानात्मक असून खेळाडूंमध्ये खूप स्पर्धा आहे. संघात निवड झालेल्या खेळाडूंमध्येही स्पर्धा असते. जेव्हा अशा गोष्टी घडतात, तेव्हा स्वतःवर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे असते. मी ज्या पद्धतीने कामगिरी करत आहे, त्यावरून मी खूश आहे. मला अजून सुधारणा करायची आहे”.

संजूकडे भारत अ संघाचे नेतृत्व

चेन्नई येथे गुरुवारपासून न्यूझीलंड अ विरुद्ध भारत अ यांच्यात तीन लिस्ट ए सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेत सॅमसन भारत अ संघाचे नेतृत्व करणार आहे. सॅमसनला याबाबत विचारले असता तो म्हणाला, “भारतीय अ संघासोबत खेळणे खरोखर महत्त्वाचे आहे. असे सामने आणि आंतरराष्ट्रीय सामने यात फारसा फरक नाही. स्पर्धा जवळपास सारखीच आहे. त्यामुळेच संधीचा उपयोग करून घेणे महत्त्वाचे आहे”.

WhatsApp channel

संबंधित बातम्या