'हेल्प मी मिस्टर तेंडुलकर', वेस्ट इंडिजच्या माजी क्रिकेटरचं सचिनला भावनिक आवाहन
Winston Benjamin: वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटपटू विन्स्टन बेंजामिन यांनी सचिन तेंडुलकरला भावनिक आवाहन केले आहे. सचिन आणि इतर क्रिकेटपटूंनी त्यांना मदत करावी, अशी त्यांची इच्छा आहे.
वेस्ट इंडिजने जगाला एकापेक्षा एक सरस क्रिकेटपटू दिले आहेत. ७० आणि ८० च्या दशकात कॅरेबियन संघाने क्रिकेट जगतावर राज्य केले. विरोधी संघाचे फलंदाज त्यांच्या वेगवान गोलंदाजांना घाबरायचे. तर त्यांच्या फलंदाजांसमोर जगातले दिग्गज गोलंदाज कमजोर वाटायचे. मात्र, हा भुतकाळ झाला. आताच्या संघात पूर्वीसारखे खेळाडू नाहीत, की प्रेक्षकांमध्ये पूर्वीसारखा जोश नाही. पण यादरम्यान, काही जुन्या काळातील खेळाडू आहेत, ज्यांना कॅरेबियन क्रिकेट पुन्हा एकदा जगभर गाजवायचे आहे. त्याचपैकी एक आहे, वेस्ट इंडिजचा माजी वेगवान गोलंदाज विन्स्टन बेंजामिन.
ट्रेंडिंग न्यूज
बेंजामिनला वेस्ट इंडिज क्रिकेट पुन्हा शिखरावर आणायचे आहे. त्याला खेळाडूंना प्रशिक्षण द्यायचे आहे. त्यासाठी त्याला भारताची मदत हवी आहे. विशेषतः भारतरत्न सचिन तेंडुलकरची.
यासाठीच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला त्याचा जुना मित्र आणि वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू विन्सन बेंजामिन याने खास विनंती केली आहे. बेंजामिनने अँटिग्वामधील मुलांसाठी क्रिकेट साहित्यांच्या मदतीची मागणी केली आहे.
ज्येष्ठ क्रीडा पत्रकार विमल कुमार भारताचा वेस्ट इंडिज दौरा कव्हर करण्यासाठी तिकडे गेले आहेत. त्या दरम्यान सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमच्या बाहेर त्यांची भेट बेंजामिन यांच्याशी झाली. विमल कुमार यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर या भेटीचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.
यामध्ये विमल सांगत आहे की, "तो (बेंजामिन) सचिन आणि मोहम्मद अझरुद्दीनचा खूप चांगला मित्र आहे. त्याचे म्हणणे सचिन, अझरुद्दीन किंवा कोणत्याही आयपीएल खेळाडूपर्यंत पोहोचवावे".
तसेच, मला पैसा किंवा इतर काही नको आहे. कॅरेबियनमधील क्रिकेटला फायदा होईल असे काहीतरी हवे आहे, असेही बेंजामिन म्हणाले.
बेंजामिन पुढे म्हणाले, 'याआधी शारजाहमध्ये स्पर्धा होत होत्या, ज्याचा फायदा होत असे. मला कोणताही फायदा नको आहे. मला असे लोक हवे आहेत, जे काही क्रीडा साहित्य पाठवू शकतील. १०-१५ बॅट्स कुणी पाठवू शकेल का?. मला २० हजार अमेरिकन डॉलर्स नको आहेत. मला फक्त साधने हवी आहेत, जेणेकरून मी तरुणांना प्रशिक्षण देत राहू शकेन'.
बेंजामिन यांनी सचिन तेंडुलकरला खास आवाहन केले की, 'मिस्टर तेंडुलकर, तुम्ही या पोझिशनवर असाल तर मला मदत करा.' यासोबतच त्यांनी मोहम्मद अझरुद्दीनचे आभार मानले आहेत. ज्यांनी त्यांना खेळाचे साहित्य पाठवले होते. बेंजामिन म्हणाले की, ज्यांना कोणाला त्यांना मदत करायची आहे, ते करु शकता'.