पॅरिस ऑलिम्पिकमधील मिश्र पिस्तुल स्पर्धेत मनू भाकरसोबत कांस्यपदक जिंकणारा नेमबाज सबरज्योत सिंग याने मोठा निर्णय घेतला आहे. २२ वर्षीय सबरजोत याने हरियाणा सरकारकडून ऑफर करण्यात आलेली मोठ्या पदाची नोकरी नाकारली आहे. सरबजोत याला हरयाणा क्रीडा विभागात उपसंचालक पद देण्यात आले होते, मात्र त्याने नेमबाजीच्या तयारीला अधिक महत्त्व देत हे पद घेण्यास नकार दिला.
सरबजोत म्हणाला, 'मला आधी माझ्या शूटिंगवर लक्ष केंद्रित करायचे आहे.' त्याने कबूल केले की त्याच्या कुटुंबाने त्याच्यावर चांगली नोकरी मिळवण्यासाठी दबाव आणला होता, परंतु त्याने त्याच्या खेळाशी असलेल्या त्याच्या बांधिलकीवर जोर दिला.
तो म्हणाला, 'माझे कुटुंबही मला चांगली नोकरी करण्यास सांगत होते, पण मला शूटिंग करायचे आहे... मी माझ्या काही निर्णयांच्या विरोधात जाऊ शकत नाही, त्यामुळे मी सध्या नोकरी करू शकत नाही.'
सरबजोतचा हा निर्णय पॅरिस ऑलिम्पिकमधील यशानंतर आला आहे, जिथे त्याने १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते. अंबाला जिल्ह्यातील धेन गावी परतल्यावर सबरजोतचे जंगी स्वागत करण्यात आले.
संपूर्ण गावकऱ्यांनी ढोल-ताशे, फुलांच्या हार आणि फटाक्यांच्या आतषबाजीत त्याचे स्वागत केले. सरबजोतच्या मेहनतीला आणि समर्पणाचा हा खरा सन्मान होता. घरी आल्यावर त्याने प्रथम आई-वडील हरजीत कौर आणि जितेंद्र सिंह यांचे आशीर्वाद घेतले आणि नंतर आनंदी लोकांमध्ये सामील झाला.
सरकारी नोकरी नाकारण्याच्या सरबजोतच्या निर्णयामुळे काही लोकांना आश्चर्य वाटले असेल, परंतु यावरून तो शूटिंगवर किती केंद्रित आहे हे दिसून येते. खेळाप्रती असलेल्या त्याच्या बांधिलकीमुळे त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळाले आहे. भविष्यात आणखी उंच उड्डाण करण्याचे त्याचे ध्येय असल्याचे त्याच्या निर्णयावरून दिसून येते. २०२८ च्या ऑलिम्पिकमध्ये त्याचे टार्गेट नक्कीच सुवर्णपदक असणार आहे.