मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Rohit Sharma : रोहित कधी काय विसरेल नेम नाही! भज्जी आणि उमेश यादवमुळं सापडली हिटमॅनची वेडिंग रिंग

Rohit Sharma : रोहित कधी काय विसरेल नेम नाही! भज्जी आणि उमेश यादवमुळं सापडली हिटमॅनची वेडिंग रिंग

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 22, 2023 07:48 PM IST

virat kohli about rohit sharma : रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकली, पण यानंतर निर्णय काय घ्यायचा आहे हे तो विसरला. रवी शास्त्रींनी काय घेणार असे विचारतचा रोहित गोंधळेला दिसला.

Rohit Sharma
Rohit Sharma

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने भारतीय संघाने जिंकले आहेत. यासोबतच भारताने मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. रायपूरमध्ये झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली. त्यामुळे न्यूझीलंडला अवघ्या १०८ धावा करता आल्या. प्रत्युत्तरात भारताने २०.१ षटकात २ बाद १११ धावा करत सामना जिंकला.

मात्र, या भारत आणि न्यूझीलंड दुसऱ्या सामन्याच्या सुरुवातीला एक विचित्र प्रसंग घडला. या घटनेमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

वास्तविक रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकली, पण यानंतर निर्णय काय घ्यायचा आहे हे तो विसरला. रवी शास्त्रींनी काय घेणार असे विचारतचा रोहित गोंधळेला दिसला. रोहित थोडा वेळ विचार करत राहिला. अशा परिस्थितीत न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथम आणि सामनाधिकारी जवागल श्रीनाथ रोहितच्या उत्तराची वाट पाहत होते. थोडा वेळ विचार केल्यानंतर रोहितने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

हा क्षण खूप मजेशीर होता. यादरम्यान टॉम लॅथम, जवागल आणि रवी शास्त्री हे तिघेही हसायला लागले. आपला निर्णय सांगतानाही रोहित दोन-तीन वेळा अडकला. पण नंतर तो म्हणाला की आम्हाला आधी गोलंदाजी करायची आहे.

दरम्यान, रोहित पहिल्यांदाच असे काही विसरेला नाही. त्याचे विसराळूपणाचे अनेक किस्से आहेत. विराट कोहलीने एका मुलाखतीत रोहितचे असे अनेक किस्से सांगितले होते.

रोहितबद्दल विराट काय म्हणाला?

विराट कोहलीने काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत सांगितले होते की, रोहित ज्या पद्धतीतने अनेक गोष्टी विसरतो. तसे कोणासोबतच घडत नसेल. या मुलाखतीनंतर हिटमॅननेही या गोष्टीला दुजोरा दिला होता. कोहली म्हणाला होता की, रोहित आयपॅड, वॉलेट, फोन अशा गोष्टी अनेकदा विसरला आहे. मात्र, तो क्रिकेटच्या गोष्टी विसरत नाही.

उमेश यादवला पाहून अंगठीची आठवण झाली

रोहितने स्वतः एका मुलाखतीत सांगितले होते की, तो एकदा लग्नाची अंगठी विसरला होता. त्यावेळी त्याचे नवीन लग्न झाले होते. पूर्वी रोहित लग्नाची अंगठी काढून झोपायचा, पण आता विसरेल या भीतीने तो अंगठी घालूनच झोपतो. रोहितने सांगितले होते की, तो तयार होऊन बसमध्ये चढला. विमानतळावर पोहोचण्यापूर्वी उमेश यादवची अंगठी पाहून त्याला त्याची अंगठी आठवली. तो अंगठी विसरला होता.

हरभजनच्या मदतीने अंगठी सापडली

त्यानंतर रोहितने हरभजन सिंगला याबाबत सांगितले. तो इतर कोणालाही ही घटना सांगू इच्छित नव्हता, कारण संघातील इतर सदस्य त्याच्यावर हसतील. हरभजनने मित्राच्या मदतीने त्याला अंगठी मिळवून दिली. त्या घटनेनंतर रोहित अंगठी कधीच विसरत नाही. हॉटेलमधून बाहेर पडण्यापूर्वी सर्व गोष्टींची आपल्याला आठवण करून द्यावी, असे त्याने आपल्या संघातील सहकाऱ्यांना सांगितले आहे. यासोबतच पत्नी रितिकाही त्याला वेळोवेळी कॉल करते आणि सर्व काही विचारते.

 

WhatsApp channel