मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Rohit Sharma Video : असं प्रेम खूप कमी खेळाडूंना मिळतं, चाहत्यानं रोहितला हक्कानं मिठी मारली

Rohit Sharma Video : असं प्रेम खूप कमी खेळाडूंना मिळतं, चाहत्यानं रोहितला हक्कानं मिठी मारली

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 21, 2023 07:26 PM IST

rohit sharma fan video raipur : रोहित शर्माने न्यूझीलंडविरुद्ध ५१ धावा फटकावल्या. या दरम्यान रोहित फलंदाजी करत असताना त्याच्या एका फॅनने मैदानात एन्ट्री केली आणि त्याला घट्ट मिठी मारली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Rohit Sharma fan raipur
Rohit Sharma fan raipur

टीम इंडियाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडचा ८ गडी राखून पराभव केला आहे. कर्णधार रोहित शर्माची ५१ धावांची खेळी आणि शुभमन गिलच्या नाबाद ४० धावांच्या बळावर भारताने सहज विजय नोंदवला. ३ सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने २-० ने आघाडी घेत मालिका जिंकली आहे.

अवघ्या १०९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियासाठी कर्णधार रोहित शर्माने तुफानी इनिंग खेळली. रोहित शर्माने ५१ धावा करत सामना लवकर संपवण्याचा प्रयत्न केला.

या दरम्यान, रोहित शर्मा फलंदाजी करत असताना एक घटना घडली. रोहितच्या एका तरुण चाहत्याने तर सर्व सुरक्षा भेदून मैदानात शिरला आणि रोहितजवळ येऊन त्याला घट्ट मिठी मारली. या प्रसंगाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

पण यावेळी रोहित शर्मा चाहत्याच्या या अचानक घेतलेल्या गळाभेटीमुळे चांगलाच बावरला होता. त्यानंतर मैदानावर सुरक्षा रक्षक देखील धावत आले आणि त्याने चाहत्याला रोहितपासून दूर केले. मात्र या दरम्यान रोहितने सुरक्षा रक्षकाला चाहत्याला काळजीपूर्वक बाहेर घेऊन जाण्यास आणि त्याच्यावर कोणतीही कारवाई न करण्यास सांगितले.

सामन्यात काय घडलं?

तत्पूर्वी, या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना अवघ्या १०८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने २०.१ षटकात २ बाद १११ धावा करत सामना जिंकला. भारताच्या वेगवान गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. भारतीय गोलंदाजांनी अवघ्या १५ धावांत न्यूझीलंडचे ५ फलंदाज तंबूत पाठवले होते. मात्र, त्यानंतर मायकल ब्रेसवेल, ग्लेन फिलिप्स आणि मिचेल सँटनर यांनी थोडाफार संघर्ष केला. त्यामुळे न्यूझीलंडला शंभरी गाठता आली. न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्सने सर्वाधिक ३६ धावा केल्या. तर ब्रेसवेलने २७ आणि सँटनरने २२ धावांचे योगदान दिले.

भारताकडून मोहम्मद शमीने ३, तर वॉशिंग्टन सुंदर आणि हार्दिक पांड्याने २-२ विकेट घेतल्या.

 

WhatsApp channel