मराठी बातम्या  /  क्रीडा  /  INDvsENG: जसप्रीत बुमराह टीम इंडियाचा कर्णधार? विराट, पंतचंही नाव चर्चेत

INDvsENG: जसप्रीत बुमराह टीम इंडियाचा कर्णधार? विराट, पंतचंही नाव चर्चेत

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jun 26, 2022 02:10 PM IST

रोहित शर्माला कोरोना झाल्यानंतर जसप्रीत बुमराहचे नावही भारताच्या भावी कर्णधाराच्या यादीत सामील झाले आहे. बुमराहची प्रथम श्रीलंकेविरुद्धच्या घरच्या T20I मालिकेत उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

japreet bumrah test captain
japreet bumrah test captain

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाला मोठा झटका बसला. कर्णधार रोहित शर्माला कोरोनाची लागण झाली आहे. आता रोहित कसोटी सामन्यात खेळणार की नाही, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. रोहित नाही खेळल्यास रिषभ पंतला टीम इंडियाचा कर्णधार बनवले जाऊ शकते, पण पंतसोबत या महत्वपूर्ण सामन्यासाठी माजी कर्णधार विराट कोहली आणि जसप्रीत बुमराहच्या नावाचाही कर्णधारपदासाठी विचार होऊ शकतो.

विशेष म्हणजे, या मालिकेतील पहिले चार सामने हे विराटच्याच नेतृत्वाखाली खेळले गेले होते. मात्र त्यावेळी कोरोनाचा प्रादूर्भाव वाढल्यामुळे पाचवा सामना पुढे ढकलण्यात आला होता. यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर विराटने सर्व फॉरमॅटचे कर्णधारपद सोडले होते. या मालिकेत रोहित शर्मा भारताचे नेतृत्व करणार होता, मात्र त्याला कोरोनाची लागण झाली आहे.

विराट कोहली पुन्हा होऊ शकतो टीम इंडियाचा कर्णधार -

विराट कोहली हा पहिला भारतीय कर्णधार आहे, ज्याने टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात कसोटी मालिकेत विजय मिळवून दिला. आता त्याला इंग्लंडमध्येही हा पराक्रम करण्याची संधी मिळणार आहे. मात्र, विराटपूर्वी भारताच्या तीन कर्णधारांनी इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकली आहे. जर विराटने शेवटच्या सामन्यात कर्णधारपद भूषवले आणि भारताने हा सामना जिंकून मालिका जिंकली तर विराट हा पहिला कर्णधार बनू शकतो, जो तीन सामने जिंकून मालिका आपल्या नावावर करेल. याआधी कोणत्याही कर्णधाराला इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत तीन सामने जिंकता आलेले नाहीत.

रिषभ पंतच्या नावाचीही चर्चा- 

रिषभ पंतने अलीकडेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20 मालिकेत पहिल्यांदाच भारतीय संघाचे नेतृत्व केले. कर्णधार म्हणून पंतने पहिले दोन सामने गमावले होते. यानंतर उर्वरित दोन सामने जिंकून मालिकेत बरोबरी साधली. पाचवा सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे मालिका अनिर्णित राहिली. मात्र, कर्णधार म्हणून पंतने बॅटिंगमध्ये खूप निराशा केली आहे. प्रत्येक वेळी तो ऑफ स्टंपच्या बाहेरील चेंडूवर बाद झाला आहे. या कसोटीत पंतने कर्णधारपद स्वीकारले तर कर्णधारपदासोबत फलंदाजीचाही दबाव त्याच्यावर असेल.

जसप्रीत बुमराहही कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा मोठा दावेदार-

रोहित शर्माला कोरोना झाल्यानंतर जसप्रीत बुमराहचे नावही भारताच्या भावी कर्णधाराच्या यादीत सामील झाले आहे. बुमराहची प्रथम श्रीलंकेविरुद्धच्या घरच्या T20I मालिकेत उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. आता तो कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा दावेदार मानला जात आहे. जसप्रीत बुमराह हा सध्या भारतीय संघाचा अविभाज्य भाग आहे. तसेच, तो तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे जसप्रीत बुमराहकडे टीम इंडियाची जबाबदारी सोपवली तरी आश्चर्य वाटायला नको.

WhatsApp channel