मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Rohit Sharma: रोहित शर्मा आशियाचा नवा किंग! सचिन-आफ्रिदीचा मोठा विक्रम मोडला

Rohit Sharma: रोहित शर्मा आशियाचा नवा किंग! सचिन-आफ्रिदीचा मोठा विक्रम मोडला

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Sep 07, 2022 09:18 PM IST

Rohit Sharma Breaks Sachin Tendulkar record: रोहित आशिया कपच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा भारतीय क्रिकेटपटूही ठरला आहे. या बाबतीत त्याने सचिन तेंडुलकरला मागे टाकले. सचिनने आशिया कपमध्ये ९७० धावा केल्या होत्या. आशिया कपमध्ये १ हजार धावा करणारा रोहित पहिला भारतीय आणि आशियातला तिसरा फलंदाज ठरला.

Rohit Sharma
Rohit Sharma

आशिया चषक स्पर्धेत श्रीलंकेविरुद्धच्या सुपर-४ सामन्यात रोहित शर्माने ४१ चेंडूत ७२ धावांची शानदार खेळी केली. त्याने आपल्या खेळीत ५ चौकार आणि ४ षटकार मारले. एका क्षणी भारताने १३ धावांवर दोन विकेट गमावल्या होत्या. यानंतर रोहितने सूर्यकुमार यादवसोबत ९७ धावांची भागीदारी केली. सोबतच रोहितने या सामन्यात अनेक विक्रमही केले.

आशिया चषकात सर्वाधिक षटकार

रोहितने आशिया कपमधील ३१ सामन्यांमध्ये २९ षटकार मारले आहेत. आशिया कपमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम आता रोहितच्या नावावर झाला आहे. या बाबतीत त्याने पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीला मागे सोडले. यापूर्वी आफ्रिदी अव्वल स्थानावर होता. आशिया कपमध्ये आफ्रिदीच्या नावावर २६ षटकार आहेत. रोहितनंतर भारताकडून सुरेश रैनाने आशिया कपमध्ये सर्वाधिक षटकार ठोकले आहेत. त्याने १८  षटकार मारले आहेत.

आशिया चषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज

याशिवाय रोहित शर्मा आशिया चषकात  सर्वाधिक धावा करणारा भारतीय क्रिकेटपटू बनला आहे. या बाबतीत त्याने सचिन तेंडुलकरला मागे टाकले. सचिनने आशिया कपमध्ये ९७० धावा केल्या होत्या. आशिया कपमध्ये १ हजार धावा करणारा रोहित पहिला भारतीय आणि आशियातला तिसरा फलंदाज ठरला आहे. रोहितने आतापर्यंत ३० डावात १०१६ धावा केल्या आहेत. सनथ जयसूर्या त्याच्या पुढे आहे. जयसूर्याने १२२० धावा केल्या होत्या. त्याचबरोबर कुमार संगकारा १०७५ धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

आशिया चषकात रोहितचे हे ९वे अर्धशतक ठरले. या बाबतीत त्याने सचिन तेंडुलकरची बरोबरी केली आहे. आशिया कपमध्ये सर्वाधिक अर्धशतके श्रीलंकेच्या कुमार संगकाराने झळकावली आहेत. त्याने १२  अर्धशतके केली आहेत.

WhatsApp channel