मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Rohit Sharma: कर्णधार गोलंदाजाचं ऐकत नाही! रोहित शर्मा ट्रोलर्सच्या निशाण्यावर

Rohit Sharma: कर्णधार गोलंदाजाचं ऐकत नाही! रोहित शर्मा ट्रोलर्सच्या निशाण्यावर

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Sep 07, 2022 02:33 PM IST

Rohit Sharma angry on Arshdeep Singh: रोहित शर्मा आणि अर्शदीप सिंग यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये रोहित शर्मा हा अर्शदीप सिंगचा सल्ला ऐकत नसल्याचे दिसून येत आहे. या व्हिडीओवरुन चाहत्यांनी रोहित शर्मावर टीका केली आहे.

Rohit Sharma
Rohit Sharma

टीम इंडियाचा आशिया कप २०२२ मधील प्रवास जवळपास संपला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघाला फायनल गाठणे फार कठीण झाले आहे. यासाठी टीम इंडियाला इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ शेवटच्या षटकात पराभूत झाला.

व्हिडीओत नेमके काय आहे

अर्शदीप सिंगनेही श्रीलंकेविरुद्ध शेवटचे षटक टाकले. या षटकात ७ धावा वाचवण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. या शेवटच्या षटकाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अर्शदीप कर्णधार रोहित शर्माला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे पण रोहित लगेचच पाठ फिरवतो आणि मागे फिरतो.

आता या व्हिडिओवर चाहते कमेंट करत आहेत की कर्णधार रोहित शर्माने अर्शदीपचा कोणताही सल्ला ऐकला नाही. अर्शदीप सिंग मैदानातील काही फिल्डिंग बदलांबद्दल बोलत होता का? असाही प्रश्न चाहते विचारत आहेत. हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असून चाहते कर्णधार रोहित शर्मावर चांगलेच संतापले आहेत.

रोहित आणि अर्शदीपच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी अनेक मीम्सही बनवले आहेत. यावेळी अनेकांनी रोहित शर्मावर निशाणा साधला आहे. साथी खेळाडूंच्या सोबत रोहितचे हे वर्तन बरोबर नसल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.

दोन्ही सामन्यात अर्शदीपची शानदार गोलंदाजी

विशेष म्हणजे पाकिस्तानविरुद्ध झेल सोडल्यानंतर अर्शदीप सिंग सोशल मीडियावर चाहत्यांच्या निशाण्यावर होता. तर टीम इंडियाने त्याला उघडपणे पाठिंबा देत हा सर्व सामन्याचा भाग असल्याचे सांगितले होते. दडपण असतानाही अर्शदीप सिंगने दोन्ही सामन्यात शेवटचे षटक टाकले आणि टीम इंडियाला विजय मिळवून देण्याचा पूर्ण प्रयत्न केला.

अर्शदीप सिंगला पाकिस्तानविरुद्ध शेवटच्या षटकात ६ धावा वाचवायच्या होत्या, त्यावेळी त्याने सामना पाचव्या चेंडूपर्यंत नेला. तर कालही शेवटच्या षटकात ७ धावांची गरज असताना त्याने सामना पाचव्या चेंडूपर्यंत नेला.

सामन्यानंतर रोहितने केले अर्शदीपचे कौतुक

दरम्यान कर्णधार रोहित शर्मानेही सामन्यानंतर अर्शदीप सिंगचे कौतुक केले आहे. अर्शदीपने दबावाखाली चांगली गोलंदाजी केली. युवा खेळाडूने अशी कामगिरी करणे खूप कौतुकास्पद असल्याचे रोहितने सांगितले.

WhatsApp channel

संबंधित बातम्या