मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Rohan Bopanna : रोहन बोपन्ना ४३ व्या वर्षी बनला चॅम्पियन, पटकावले ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद

Rohan Bopanna : रोहन बोपन्ना ४३ व्या वर्षी बनला चॅम्पियन, पटकावले ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 27, 2024 06:15 PM IST

Rohan Bopanna Australian Open 2024 : ओपन एरामध्ये ग्रँडस्लॅम जिंकणारा रोहन बोपण्णा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला. वयाच्या ४३ वर्षे ३२९ दिवसांत तो चॅम्पियन बनला आहे.

Rohan Bopanna Australian Open 2024
Rohan Bopanna Australian Open 2024 (REUTERS)

Australian Open 2024 Mens Doubles Final : ऑस्ट्रेलियन ओपनच्या पुरुष दुहेरीत रोहन बोपण्णा आणि मॅथ्यू एबडेन या जोडीने इतिहास रचला आहे. या दोघांनीही अंतिम फेरीत सिमोन बोलेली आणि आंद्रिया वावासोरी या इटालियन जोडीचा सरळ सेटमध्ये पराभव केला.

विशेष म्हणजे, भारताचा बोपण्णा आणि ऑस्ट्रेलियाचा एबडेन या जोडीने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावले आहे. बोपण्णा आणि एबडेन यांनी हा सामना ७-६ (७-०), ७-५ असा जिंकला. दोघांनी पहिला सेट ७-६ (७-०) असा जिंकला, हा सेट टायब्रेकरपर्यंत गेला. यानंतर दुसरा सेट ७-५ अशा फरकाने जिंकला.

४३ वर्षीय बोपण्णा नुकताच पुरुष दुहेरीच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. प्रतिष्ठेच्या पद्मश्री पुरस्कारासाठीही त्याची निवड झाली होती. ओपन एरामध्ये ग्रँडस्लॅम जिंकणारा बोपण्णा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला. वयाच्या ४३ वर्षे ३२९ दिवसांमध्ये तो चॅम्पियन बनला.

बोपण्णाला ऑस्ट्रेलियन ओपन जिंकण्यासाठी ६१ सामने लागले

ग्रँडस्लॅम पुरुष दुहेरी स्पर्धेत रोहन बोपण्णाचा हा ६१वा सामना होता. त्याने १९ वेगवेगळ्या पार्टनरसोबत सामने खेळले आहेत. बोपण्णाने अमेरिकेच्या राजीव रामचा अनोखा विक्रम मोडला. पुरुष दुहेरीचे पहिले विजेतेपद जिंकण्यापूर्वी बोपण्णा या स्पर्धेत सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू ठरला आहे. राजीव रामला पहिले पुरुष दुहेरी ग्रँडस्लॅम जिंकण्यासाठी ५८ सामने लागले. तर बोपण्णाने आपल्या ६१व्या सामन्यात हे विजेतेपद पटकावले.

बोपण्णाचे दुसरे ग्रँण्डस्लॅम टायटल

रोहन बोपण्णाचे हे दुसरे ग्रँण्डस्लॅम जेतेपद आहे. यापूर्वी २०१७ मध्ये बोपण्णाने फ्रेंच ओपनमध्ये कॅनडाच्या गॅब्रिएला डॅब्रोव्स्कीसोबत मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकावले होते. 

तर बोपण्णा दोनदा पुरुष दुहेरीत युएस ओपनचा उपविजेता राहिला आहे. २०१० मध्ये त्याने पाकिस्तानच्या ऐसाम-उल-हक कुरेशी आणि २०२३ मध्ये एबडेनसोबत युएस ओपनची फायनल खेळली होती. मात्र, दोन्ही वेळी त्याचा पराभव झाला आणि उपविजेता ठरला.

WhatsApp channel