भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा याने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या पुरुष भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. नीरजला ब गटात ठेवण्यात आले होते. येथे मंगळवारी (६ ऑगस्ट) त्याने पहिल्याच प्रयत्नात ८९.३४ मीटर भाला फेकून फायनलचे तिकिट मिळवले.
पात्रता फेरीत नीरजने ८९.३४ मीटर भालाफेक करत अव्वल स्थान मिळवले. आता सर्वांच्या नजरा त्याच्या सुवर्णपदक जिंकण्यावर खिळल्या आहेत, यामध्ये भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतचाही समावेश आहे.
वास्तविक, ऋषभ पंत याने नीरजला पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने पाठिंबा दिला आहे, ज्यामध्ये त्याने आपल्या ट्विटद्वारे चाहत्यांसाठी बक्षीस जाहीर केले आहे. जर नीरजने सुवर्ण जिंकले तर ऋषभ पंत चाहत्यांना एक लाख रुपयांहून अधिक रकमेचे बक्षीस देईल.
टीम इंडिया सध्या सध्या श्रीलंका दौऱ्यावर असून तिथे ३ वनडे सामन्यांची मालिका खेळली जात आहे. सध्या ऋषभ टीम इंडियासोबत श्रीलंकेत आहे . तिथून त्याने नीरज चोप्राच्या समर्थनार्थ ट्विट केले आणि लिहिले की, “जर उद्या नीरजने सुवर्णपदक जिंकले तर मी त्या खास चाहत्याला १०००८९ रुपये देईन. जो या ट्विटवर सर्वात जास्त लाइक आणि कमेंट करेल आणि बाकीचे चाहते जे टॉप-१० मध्ये राहतील त्यांना फ्लाइट तिकीट मिळेल. आपण सर्वांनी आपला भाऊ नीरजला साथ देऊया".
श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेतील सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये पंतला अद्याप प्लेईंग ११ मध्ये स्थान मिळालेले नाही आणि त्याच्या जागी केएल राहुल मुख्य यष्टिरक्षकाची भूमिका बजावत आहे.
टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये ८७.५८ मीटर भाला फेक करून सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिकच्या पात्रता फेरीत इतर खेळाडूंच्या तुलनेत सर्वात लांब भालाफेक केली.
नीरज पुन्हा ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकण्यासाठी ८ ऑगस्ट रोजी मैदानात उतरणार आहे.
दरम्यान, पात्रता फेरीनंतर अधिकृत प्रसारकांशी संवाद साधताना नीरज म्हणाला होता की, मी पॅरिसला जे करायला आलो आहे तेच करेन. हा क्षण माझ्यासोबत कायमचा राहणार आहे आणि येणाऱ्या पिढ्यांनाही तो खूप प्रेरणा देईल असे मला वाटते".