मराठी बातम्या  /  क्रीडा  /  ‘ऋषभ पंत संघावर ओझं झालाय, त्याला हाकला! प्रत्येक गोष्टीची एक लिमिट असते’

‘ऋषभ पंत संघावर ओझं झालाय, त्याला हाकला! प्रत्येक गोष्टीची एक लिमिट असते’

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Nov 24, 2022 04:57 PM IST

Rishabh Pant: गेल्या काही काळापासून खराब फॉर्ममध्ये असलेला भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याला संघातून वगळण्याची मागणी होत आहे.

Rishabh Pant
Rishabh Pant

भारतीय क्रिकेट संघाचा भावी कर्णधार व मॅचविनर म्हणून ज्याच्याकडं कालपर्यंत पाहिलं जातं होतं, तो ऋषभ पंत सततच्या खराब कामगिरीमुळं आता माजी क्रिकेटपटूंच्या रडारवर आला आहे. 'प्रत्येक गोष्टीची एक मर्यादा असते, ऋषभच्या बाबतीत ती संपली आहे. ऋषभ पंत हा संघावर एक ओझं झाला आहे. त्याला संघाबाहेर हाकलण्याची वेळ आली आहे,' असं अत्यंत परखड मत माजी क्रिकेटपटू रितेंदरसिंग सोढी यानं व्यक्त केलं आहे.

टी-२० वर्ल्डकपमध्ये ऋषभची कामगिरी चांगली झाली नाही. बेजबाबदार फटके मारून तो बाद झाला. त्यामुळं त्याच्यावर जोरदार टीका होत आहे. 'ऋषभ पंतच्या जागी आता संजू सॅमसनला संधी द्यायला हवी. कधी ना कधी, तुम्हाला निर्णय घ्यावाच लागेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेतून पुन्हा पुन्हा बाद होणं संघाला परवडणारं नाही. एखाद्या खेळाडूला गरजेपेक्षा जास्त संधी मिळायला लागली की अडचणी सुरू होतात. आता नव्या खेळाडूंना संधी देण्याची वेळ आली आहे, असं सोढी यानं म्हटलं आहे. तो 'इंडिया न्यूज' या वृत्तवाहिनीशी बोलत होता.

'ऋषभ पंतला आणखी किती संधी मिळतील हे येणारा काळच सांगेल. पण, आता त्याच्याकडं फार वेळ राहिलेला नाही. त्याला कंबर कसून मैदानात उतरावं लागेल आणि पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध करावं लागेल. कारण, प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते. कुठल्याही संघाला एका खेळाडूवर जास्त काळ अवलंबून राहता येत नाही. चांगली कामगिरी करत नसेल तर बाहेरचा रस्ता दाखवावा लागेल. 'पंत हा मॅचविनर खेळाडू आहे हे मान्य असलं तरी त्याच्या धावाच होत नसतील तर संघाला त्याचा काही फायदा नाही, असं सोढी म्हणाला.

'वर्ल्ड कपसारख्या मोठ्या स्पर्धेत पंतला संधी मिळाली. यापूर्वी त्याला अशा संधी मिळत नव्हत्या हे खरं आहे, पण एकदा संधी मिळाल्यानंतर चांगली कामगिरी करणं हे त्याचं काम आहे. ते त्याच्याकडून होताना दिसत नाही. त्यामुळं त्याच्या व्यतिरिक्त एखाद्या खेळाडूचा विचार करण्याची वेळ आली आहे, असं सोढी म्हणाला.

WhatsApp channel

विभाग