मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Rishabh Pant: २४ व्या वर्षीच पंतने मोडला सचिन-रैनाचा मोठा विक्रम, पाहा आकडेवारी
pant
pant

Rishabh Pant: २४ व्या वर्षीच पंतने मोडला सचिन-रैनाचा मोठा विक्रम, पाहा आकडेवारी

02 July 2022, 14:47 ISTRohit Bibhishan Jetnavare

रिषभ पंतने (rishabh pant)  वयाच्या २४ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० षटकार ठोकण्याचा विक्रम केला आहे. त्याने इंग्लंडविरुद्ध पहिल्या डावात १४६ धावा केल्या. यादरम्यान त्याने १९ चौकार आणि ४ षटकार ठोकले. यानंतर त्याने सचिन तेंडुलकर आणि सुरेश रैना यांना मागे टाकले आहे.

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्यात रिषभ पंतने शानदार फलंदाजी केली. त्याने १११ चेंडूत १४६ धावा केल्या. या आक्रमक खेळीदरम्यान त्याने अनेक खास विक्रम आपल्या नावावर केले आहेत. या सामन्यात २४ वर्षीय पंतने सचिन तेंडुलकर आणि सुरेश रैना यांना मागे टाकले आहे. पंतने सामन्याच्या पहिल्याच दिवशी १९ चौकार आणि चार षटकार मारले. यासह त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० षटकार पूर्ण केले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० षटकार ठोकणारा रिषभ पंत हा सर्वात तरुण भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. तर या विक्रमात सुरेश रैना दुसऱ्या क्रमांकावर होता.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० षटकार मारणारे सर्वात तरुण भारतीय फलंदाज-

१) रिषभ पंत - २४ वर्षे, २७१ दिवस

२) सचिन तेंडुलकर - २५ वर्षे

३) सुरेश रैना - २५ वर्षे, ७७ दिवस

कसोटी क्रिकेटमध्ये पंतच्या दोन हजार धावा पूर्ण-

या शतकासह रिषभ पंतने कसोटी क्रिकेटमधील दोन हजार धावाही पूर्ण केल्या आहेत. आता त्याच्या नावावर ३१ सामन्यांमधील ५२ डावांत २०६६ धावा जमा झाल्या आहेत. त्याची कसोटी क्रिकेटमध्ये सरासरी ४३.०४ इतकी आहे. तसेच, कसोटी क्रिकेटमध्ये पंतच्या नावावर आता पाच शतके जमा झाली आहेत. सोबतच त्याने आतापर्यंत नऊ अर्धशतकेही झळकावली आहेत. नाबाद १५९ ही त्याची कसोटी क्रिकेटमध्ये सर्वोच्च धावसंख्या आहे.

पंत-जडेजाने डाव सावरला-

या निर्णायक कसोटी सामन्यात रिषभ पंतने संकटमोचकाची भूमिका बजावली. रिषभ क्रिजवर आला तेव्हा टीम इंडियाने ६४ धावांवर तीन विकेट गमावल्या होत्या. विराट कोहली दुसऱ्या एंडकडून खेळत होता, पण कोहलीही ११ धावा करून लवकरच बाद झाला. यानंतर श्रेयस अय्यरही फार काही करू शकला नाही आणि १५ धावा करून तंबूत परतला. ९८ धावांवर भारताचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला होता. या अडचणीच्या काळात पंत आणि जडेजा यांनी संघाचा डाव सावरला.

दोघांनी विक्रमी २२२ धावांची भागीदारी रचली. यादरम्यान पंतने कसोटी कारकिर्दीतील पाचवे शतक पूर्ण केले. हे त्याचे इंग्लंडविरुद्धचे तिसरे आणि भारताबाहेरचे चौथे शतक आहे. पंत बाद झाला तेव्हा भारताची धावसंख्या ३२० धावा होती. पंतने या सामन्यात १३१.५३ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. त्याच्या झंझावाती खेळीमुळे भारतीय संघ पहिल्या दिवशी ७३ षटकांत ३३८ धावा करू शकला.