मराठी बातम्या  /  क्रीडा  /  ‘जे सचिनबाबत केलं तेच रिषभ पंतसोबत करा’, इतिहास घडेल; दिग्गजाचा लाखमोलाचा सल्ला

‘जे सचिनबाबत केलं तेच रिषभ पंतसोबत करा’, इतिहास घडेल; दिग्गजाचा लाखमोलाचा सल्ला

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jun 21, 2022 02:44 PM IST

टी-२० विश्वचषकापूर्वी संजय बांगर (sanjay bangar) यांनी टीम इंडियाला (team india) रिषभ पंतबाबत एक मोठा सल्ला दिला आहे. बांगर म्हणाले की, "टीम इंडियाने पंतला ओपनिंगला पाठवावे", यादरम्यान त्याने सचिन तेंडुलकरचे (sachin tendulkar) उदाहरणही दिले आहे.

sachin and rishabh
sachin and rishabh

भारताचे (team india) माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर (sachin tendulkar)  यांनी रिषभ पंतबाबत (rishabh pant) मोठे वक्तव्य केले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नुकत्याच संपलेल्या टी-२० मालिकेत पंत फॉर्मशी झुंजताना दिसला, बऱ्याच काळापासून पंतने त्याच्या क्षमतेनुसार धावाही केल्या नाहीत. पंतच्या फॉर्मबाबत अनेक दिग्गजांनी कठोर विधाने केली आहेत. परंतु तो खराब फॉर्मात असूनही संघ व्यवस्थापन त्याला पूर्ण पाठिंबा देत आहे.

यावरुनच टी-२० विश्वचषकापूर्वी संजय बांगर .यांनी टीम इंडियाला रिषभ पंतबाबत एक मोठा सल्ला दिला आहे. बांगर म्हणाले की, "टीम इंडियाने पंतला ओपनिंगला पाठवावे", यादरम्यान त्याने सचिन तेंडुलकरचे (sachin tendulkar) उदाहरणही दिले आहे.

माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर म्हणाले की, "जेव्हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरला डावाची सुरुवात करण्यासाठी पाठवले, तेव्हा सचिनच्या खेळात सातत्य दिसले. पंतबाबतही अगदी तसेच होऊ शकते. जर पंतला सुरुवातीला फलंदाजीची संधी दिली तर तो विरोधी संघासाठी मोठा धोका ठरु शकतो. जसे खेळाच्या छोट्या फॉरमॅटमध्ये अॅडम गिलख्रिस्टने ऑस्ट्रेलियासाठी जे केले आहे, तसेच पंतही टीम इंडियासाठी करु शकतो".

सोबतच, "मी गेल्या ३ वर्षांपासून याबद्दल विचार करत आहे. जर तुम्ही सचिन तेंडुलकरच्या कारकिर्दीवर नजर टाकली तर, त्याने ७५ व्या किंवा ७६ व्या डावात पहिले शतक झळकावले होते, जेव्हा त्याला मधल्या फळीतून ओपनिंगला फलंदाजी करण्याची संधी मिळाली", असेही बांगर म्हणाले.

बांगर पुढे म्हणाले की, "सध्या भारतीय संघ डाव्या-उजव्या सलामी जोडीच्या शोधात आहे. होय, इशान किशन आता चांगली कामगिरी करत आहे. परंतु, जर भारतीय संघाला दूर पर्यंतचा विचार करायचा असेल तर रिषभ पंत हाच योग्य पर्याय आहे. अॅडम गिलख्रिस्टने ऑस्ट्रेलियासाठी जे केले ते पंत भारतासाठी करू शकतो".

WhatsApp channel