जबरदस्त! मराठमोळ्या स्वप्नील कुसळे याचा कांस्य पदकावर नेम, भारताच्या झोळीत तिसरं पदक
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  जबरदस्त! मराठमोळ्या स्वप्नील कुसळे याचा कांस्य पदकावर नेम, भारताच्या झोळीत तिसरं पदक

जबरदस्त! मराठमोळ्या स्वप्नील कुसळे याचा कांस्य पदकावर नेम, भारताच्या झोळीत तिसरं पदक

Aug 01, 2024 01:57 PM IST

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताला तिसरे पदक मिळाले आहे. कोल्हापूरच्या स्वप्निल कुसळे याने नेमबाजीत कांस्य पदकाची कमाई केली.

Swapnil Kusale : मराठमोळ्या स्वप्नील कुसळेचा कांस्यपदकावर निशाणा, भारताच्या झोळीत तिसरं पदक
Swapnil Kusale : मराठमोळ्या स्वप्नील कुसळेचा कांस्यपदकावर निशाणा, भारताच्या झोळीत तिसरं पदक

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताच्या झोळीत तिसरे पदक आले आहे. भारताच्या स्वप्नील कुसळेने इतिहास रचला आहे. पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन नेमबाजीत मराठमोळ्या स्वप्नीलने कांस्यपदक जिंकले. ऑलिम्पिकमधील ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात प्रथमच भारतीय नेमबाजाने पदक जिंकले आहे. चालू ऑलिम्पिक स्पर्धेतील भारताचे हे तिसरे पदक होते. याआधी भारताची शेवटची दोन पदके नेमबाजीतही आली होती.

स्वप्नीलने ५० मीटर रायफल स्पर्धेत चमकदार कामगिरी करत एकूण ४५१.४ इतका स्कोअर केला. चीनचा लिऊ युकुन अव्वल स्थानावर राहिला. त्याचा स्कोर ४६३.६ होता. तर युक्रेनच्या कुलिस सेरहीने दुसरा क्रमांक पटकावला.

स्वप्नील कुसळेने डावाची संथ सुरुवात केली. त्याने १५३.३ (पहिली सीरीज- ५०.८, दुसरी सीरीज- ५०.९, तिसरी सीरीज- ५१.६) स्कोअर केला. तो सहाव्या क्रमांकावर राहिला. यानंतर, त्याने प्रोनमध्ये (पहिली सीरीज- ५२.७, दुसरी सीरीज- ५२.३, तिसरी सीरीज- ५१.९) १५६.८ गुण मिळवून आपली स्थिती सुधारली. 

प्रोननंतर तो पाचव्या क्रमांकावर पोहोचला होता. येथून त्याला चमत्कार करण्याची गरज होती.

क्रमवारीत, स्वप्नील कुसळेने पहिल्या सीरीजमध्ये ५१.१ आणि दुसऱ्या सीरीजमध्ये ५०.४ म्हणजेच एकूण १०१.५ गुण मिळवले. म्हणजेच त्याचा एकूण स्कोअर ४२२.१ होता आणि तो तिसऱ्या स्थानावर पोहोचला. इथून पुढे आव्हान आणखी गंभीर होते. पण इथून पुढे स्वप्नील कुसळेने मागे वळून पाहिले नाही. एलिमिनेशनमध्ये त्याने शानदार पद्धतीने कांस्यपदक पटकावले.

 

स्वप्नीलपूर्वी मनू भाकरने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदक जिंकले होते. त्याचवेळी सरबजोतसह मनूने १० मीटर एअर पिस्तूल मिश्र प्रकारात कांस्यपदक जिंकले.अशा प्रकारे पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये आतापर्यंत भारताच्या खात्यात तीन पदकं आली आहे.

दरम्यान, १७ मे २०२४ रोजी भोपाळ येथे झालेल्या अंतिम निवड चाचणीमध्ये स्वप्नील २०२४ च्या ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला. १९९५ मध्ये जन्मलेला स्वप्नील शेतकरी कुटुंबातून इथवर पोहोचला आहे.

स्वप्नील कुसळे हा त्याच्या शांत स्वभावासाठी ओळखला जातो. पण आता पदक जिंकल्यानंतर सोशल मीडियावर त्याच्या अभिनंदनाचा महापूर आला आहे. विशेष म्हणजे तो एमएस धोनीपासून प्रेरित आहे आणि महान भारतीय क्रिकेट कर्णधाराप्रमाणे तो रेल्वे तिकीट कलेक्टर देखील आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या