मराठी बातम्या  /  क्रीडा  /  RCB Vs UPW WPL 2023 : स्मृती मानधनाच्या आरसीबीचा सलग चौथा पराभव, यूपीकडून १० विकेट्सनं धुव्वा

RCB Vs UPW WPL 2023 : स्मृती मानधनाच्या आरसीबीचा सलग चौथा पराभव, यूपीकडून १० विकेट्सनं धुव्वा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Mar 10, 2023 10:35 PM IST

WPL 2023 Highlights, UP vs RCB Womens Premier League 2023 : महिला प्रीमियर लीगमधील (WPL 2023) आठवा सामना आज (१० मार्च) युपी वॉरियर्स (WPW) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यात खेळला गेला. या सामन्यात युपीने आरसीबीचा १० विकेट्सने धुव्वा उडवला.

RCB Vs UP Highlights
RCB Vs UP Highlights

WPL 2023 Highlights, UP vs RCB Women’s Premier League 2023 : महिला प्रीमियर लीग (WPL) च्या आठव्या सामन्यात यूपी वॉरियर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा १० विकेट्सने धुव्वा उडवला आहे. गडी राखून पराभव केला. युपीचा या स्पर्धेतील तीन सामन्यांतील हा दुसरा विजय आहे. त्याचवेळी आरसीबीचा संघ सलग चौथ्या सामन्यात पराभूत झाला आहे. 

नाणेफेक जिंकून आरसीबीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर त्यांचा संपूर्ण संघ १९.३ षटकांत १३८ धावांत गारद झाला. प्रत्युत्तरात यूपी वॉरियर्सने १३ षटकात एकही विकेट न गमावता १३९ धावा करत सामना जिंकला.

युपीला या स्पर्धेतील दुसरा विजय मिळाला आहे. तीन सामन्यांत त्यांचे ४ गुण झाले आहेत. ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत. दिल्ली कॅपिटल्सचे देखील तीन सामन्यांतून ४ गुण आहेत, परंतु ते चांगल्या नेट रनरेटसह दुसऱ्या स्थानावर आहेत. मुंबई इंडियन्सचा संघ तीन सामन्यांत तीन विजयांसह अव्वल स्थानावर आहे.

१३९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना युपीने शानदार सुरुवात केली. कर्णधार एलिसा हिली आणि देविका वैद्य यांनी यूपीसाठी पहिल्या विकेटसाठी १३९ धावांची भागीदारी केली. पण एलिसा हिलीला शतक पूर्ण करता आले नाही. तिने ४७ चेंडूत ९६ धावांवर नाबाद राहिली. तिने आपल्या खेळीत १८ चौकार आणि १ षटकार मारला. देविकाने ३१ चेंडूंत ५ चौकारांच्या मदतीने नाबाद ३६ धावा केल्या.

आरसीबीचा डाव

आरसीबीच्या फलंदाजांची खराब कामगिरी या सामन्यातही कायम राहिली. नाणेफेक जिंकल्यानंतर आरसीबीच्या संघाचा डाव १९.३ षटकात १३८ धावांवर गारद झाला. त्यांच्यासाठी केवळ चारच फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. एलिस पॅरीने ३९ चेंडूत सर्वाधिक ५२ धावा केल्या. सोफी डेव्हाईनने २४ चेंडूत ३६, श्रेयंका पाटीलने १० चेंडूत १५ आणि एरिन बर्न्सने ९ चेंडूत १२ धावा केल्या. कर्णधार स्मृती मानधना केवळ ४ धावा करू शकली.

WhatsApp channel