Royal Challengers Bangalore In IPL 2024 : यंदाच्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये चमकदार कामगिरी करूनही विजेतेपद पटकावता न आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने मोठे फेरबदल करण्यास सुरुवात केली आहे. आगामी आयपीएल स्पर्धेत जून्या खेळाडूंसोबतच नव्या चेहऱ्यांनाही संधी देण्याचा निर्णय आरसीबीने घेतला आहे. तसेच संघाचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर आणि क्रिकेट संचालक माईक हेसन यांच्यासोबतचा करार कायमचा संपवण्याचा निर्णय आरसीबी संघाने घेतला आहे. त्यामुळं आता आरसीबीकडून नव्या प्रशिक्षकांचा शोध घेण्यात येत आहे. गेल्या १६ हंगामापासून आरसीबीला एकदाही विजेतेपद जिंकता आलेलं नाही. त्यामुळं येत्या हंगामात नव्या उमेदीने सामोरं जाण्याची तयारी आरसीबीकडून करण्यात येत आहे.
आरसीबीने संजय बांगर आणि माईक हेसन यांच्यासोबत पाच वर्षांचा करार केला होता. गेल्या दोन हंगामापासून आरसीबी संघ टॉप पाच संघात प्रवेश करत असल्यामुळं प्रशिक्षकांना आणखी वेळ दिला जाणार असल्याची चर्चा होती. परंतु आरसीबीच्या अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीत संजय बांगर आणि माईक हेसन यांच्यासोबत पुन्हा करार न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे आरसीबीचे गोलंदाजी प्रशिक्षक अॅडम ग्रिफिथ यांचा करार कंटिन्यू होणार की नाही?, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
गेल्या तीन ते चार वर्षांपासून आरसीबीच्या ड्रेसिंग रुममध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न संजय बांगर आणि माईक हेसन यांच्याकडून करण्यात आला होता. परंतु संघ विजेता होत नसल्याने त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्हं उपस्थित होत होते. आरसीबीकडून विराट कोहली, ख्रिस गेल, शेन वॉटसन, एबी डिव्हिलियर्स यांच्यासारख्या स्टार खेळाडूंनी सामने खेळले आहे. परंतु तरीदेखील १६ हंगामात आरसीबीला एकदाही विजेतेपद मिळवता आलेलं नाही. २००९, २०११ आणि २०१६ साली आरसीबी संघ फायनलपर्यंत पोहचला होता. परंतु तिन्ही वेळा त्यांचा फायनलमध्ये पराभव झालेला आहे. त्यामुळं आता आरसीबी संघाचे नवीन प्रशिक्षक कोण असणार?, याविषयी तर्कवितर्क लावले जात आहे.