मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Glenn Maxwell Injury : मॅक्सवेल आयपीएलला मुकणार? आरसीबीला बसू शकतो मोठा धक्का

Glenn Maxwell Injury : मॅक्सवेल आयपीएलला मुकणार? आरसीबीला बसू शकतो मोठा धक्का

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Mar 25, 2023 07:51 PM IST

glenn maxwell fitness update injury : आयपीएल २०२३ सुरू होण्यापूर्वी आरसीबीला मोठा धक्का बसू शकतो. त्यांचा खेळाडू ग्लेन मॅक्सवेलचा पाय १०० टक्के तंदुरुस्त नाहीए.

Glenn Maxwell Injury IPL 2023
Glenn Maxwell Injury IPL 2023

glenn maxwell fitness update injury : आयपीएल २०२३ अगदी जवळ आले आहे. स्पर्धेला सुरुवात होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. या मोसमात पुन्हा एकदा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू पूर्ण तयारीत दिसत आहे, मात्र स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. संघाचा स्टार फलंदाज ग्लेन मॅक्सवेल पूर्णपणे तंदुरुस्त नाही. मॅक्सवेलने स्वत: त्याच्या फिटनेसबाबत अपडेट दिले आहे. त्याने सांगितले की त्याला पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी काही महिने लागतील.

नोव्हेंबर २०२२ मध्ये ग्लेन मॅक्सवेलच्या पायात फ्रॅक्चर झाले होते. वाढदिवसाच्या पार्टीत तो दुखापतग्रस्त झाला होता. यानंतर तो जवळपास ६ महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता. तो IPL 2023 साठी बेंगळुरूला पोहोचला आहे. परंतु त्याची दुखापत बेंगळुरूसाठी चिंतेचा विषय बनू शकते.

१०० टक्के फिट होण्यासाठी काही महिने लागतील

आरसीबीच्या सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओद्वारे मॅक्सवेल म्हणाला, “पाय ठीक आहे. मला १०० टक्के बरे होण्यासाठी काही महिने लागतील. आशा आहे की ते (पाय) स्पर्धेसाठी चांगले असतील आणि ते त्यांचे कार्य देखील करतील. पुढे बोलताना तो म्हणाला की, “शेवटी काही वर्षांनी पुनरागमन करत आहे. हे खूप रोमांचक आहे आणि मी माझ्या घरच्या चाहत्यांसमोर खेळायला खूप उत्सुक आहे.

विशेष म्हणजे नुकत्याच झालेल्या भारताविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात तो दिसला होता. या सामन्यात फलंदाजी करताना त्याने ८ धावा केल्या आणि २ षटके गोलंदाजीही केली होती.

मॅक्सवेलसाठी आयपीएल २०२२ चांगले होते

बेंगळुरूकडून खेळताना मॅक्सवेलने IPL 2022 च्या १३ सामन्यांमध्ये २७.३६ च्या सरासरीने आणि १६९.१० च्या स्ट्राइक रेटने ३०१ धावा केल्या होत्या. यामध्ये त्याने एक अर्धशतक झळकावले होते. त्याच वेळी, त्याने गोलंदाजीमध्ये एकूण ६ विकेट घेतल्या होत्या.

 

WhatsApp channel