Wasim Akram On Virat Kohli : यंदाच्या आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने चांगली सुरुवात करत प्लेऑफच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे. आरसीबीने पाच सामने जिंकले असून संघाचा पुढील सामना मुंबई इंडियन्सशी होणार आहे. परंतु आता विराट कोहली चांगली कामगिरी करत असताना आरसीबी आतापर्यंत एकदाही आयपीएल का जिंकू शकला नाही?, असा प्रश्न अनेकदा खेळाडू आणि चाहते उपस्थित करत असतात. आता याच प्रश्नाचं उत्तर पाकिस्तानचा माजी दिग्गज गोलंदाज वसीम आक्रमने दिलं आहे. याशिवाय महेंद्रसिंह धोनीच्या सीएसकेला आयपीएलमध्ये सातत्याने यश कसं मिळतं, याबाबतही त्याने मोठा खुलासा केला आहे.
एका स्पोर्ट्स वेबसाईट्सशी बोलताना पाकिस्तानचा माजी गोलंदाज वसीम अक्रम म्हणाला की, महेंद्रसिंह धोनी जर कर्णधार असता तर आरसीबी संघ आतापर्यंत तीन ते चार वेळा आयपीएलचा विजेता असता. आरसीबीला आयपीएल जिंकून देण्यासाठी विराट कोहलीने खूप मेहनत घेतली आणि तसे प्रयत्नही केले आहेत. परंतु फक्त विराटचे प्रयत्न पुरेसे नाहीत, संघातील अन्य खेळाडूंनीही तितकीच मेहनत घ्यायला हवी होती. याच कारणामुळं आरसीबीचा संघ आतापर्यंत एकदाही आयपीएल जिंकू शकलेला नाही.
महेंद्रसिंह धोनी याच्याकडे भारतीय क्रिकेट संघाचं नेतृत्व केल्याचा अनुभव होता. त्याचा फायदा त्याला चेन्नई सुपर किंग्जचं नेतृत्व करताना झाला. धोनीच्या नेतृत्वात नवख्या आणि अनुभवी खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. आता विराट कोहली यालाही भारतीय संघाचं नेतृत्व करण्याचा अनुभव आहे. आरसीबीचं नेतृत्व करताना विराट कोहली शांत दिसतो, परंतु तो शांत नाहीये. त्यामुळं त्याचाही फटका आरसीबीला बसत असल्याचं वसीम अक्रमने म्हटलं आहे. याशिवाय महेंद्रसिंह धोनी जेव्हा सीएसकेच्या खेळाडूंच्या खांद्यावर हात ठेवतो, तेव्हा त्यांचा आत्मविश्वास वाढतो. त्यामुळेच सीएसकेने आतापर्यंत चार वेळा आयपीएल जिंकलं असल्याचंरही वसीम अक्रमने म्हटलं आहे.
यंदाच्या आयपीएलमध्ये आरसीबीने पाच सामने जिंकले आहे. आयपीएलमधील प्लेऑफच्या शर्यतीत आरसीबीचा संघ आहे. मंगळवारी आरसीबी आणि मुंबई इंडियन्ससाठी करो या मरोची लढत असणार आहे. त्यामुळं आता उद्याच्या सामन्यात रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सचा पराभव करत प्लेऑफसाठी स्थिती भक्कम करण्याचा प्रयत्न विराट कोहली आणि आरसीबीच्या खेळाडूंचा असणार आहे.