मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Ravindra Jadeja vs CSK: धोनी - जड्डूमध्ये दुरावा? जडेजा नव्या संघाच्या शोधात

Ravindra Jadeja vs CSK: धोनी - जड्डूमध्ये दुरावा? जडेजा नव्या संघाच्या शोधात

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jul 09, 2022 03:12 PM IST

रविंद्र जडेजा आणि सीएसकेने सोशल मीडियावर एकमेकांना आधीच अनफॉलो केले होते. त्यानंतर आता जडेजाने त्याच्या इंस्टाग्राम बायोमधून चेन्नईचे नाव काढून टाकले आहे, तसेच गेल्या दोन वर्षातील सर्व पोस्ट डीलिट केल्या आहेत.

csk
csk

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा आणि टीम चेन्नई सुपर किंग्ज (CSK) यांच्यातला वाद (Ravindra Jadeja vs CSK) अजूनही सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे. आता जडेजाने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून CSK शी संबंधित सर्व पोस्ट डीलिट केल्या आहेत. जडेजाच्या या कृतीनंतर सोशल मीडियावर बरेच तर्क वितर्क लढवले जात आहेत. सोबतच आयपीएलच्या पुढच्या मोसमापासून जडेजा दुसऱ्या संघाकडून खेळताना दिसणार असल्याचेही चाहते म्हणत आहेत.

जडेजा आणि सीएसकेने सोशल मीडियावर एकमेकांना आधीच अनफॉलो केले होते. त्यानंतर जडेजाने आपल्या इंस्टाग्राम बायोमधून चेन्नईचे नाव काढून टाकले होते. तर आता गेल्या दोन वर्षातील सर्व पोस्ट देखील डीलिट केल्या आहेत. इतकंच नाही तर जडेजाने महेंद्रसिंग धोनीला त्याच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छाही दिल्या नाहीत, अशी चर्चा आहे.

जडेजा २०१२ पासून चेन्नई सुपर किंग्जचा भाग आहे. १० वर्षांत त्याने संघासाठी खूप मोठे योगदान दिले आहे.

दरम्यान, आयपीएल २०२२ सुरू होण्याच्या दोन दिवस आधी महेंद्रसिंग धोनीने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर रवींद्र जडेजाला कर्णधार बनवण्यात आला. मात्र, त्याच्या नेतृत्वात संघाची कामगिरी फारच निराशाजनक राहिली. त्यामुळे केवळ ३७ दिवसांनंतरच जडेजाला कर्णधार पदावरुन हटवले गेले. त्यानंतर पुन्हा धोनीला चेन्नई संघाच्या कर्णधारपदाची कमान सोपवण्या आली.

विशेष म्हणजे, चेन्नई सुपर किंग्सने यावेळच्या आयपीएल लिलावापूर्वी धोनी-जडेजासह ४ खेळाडूंना रिटेन केले होते. जाडेजाला फ्रँचायझीने सर्वाधिक १६ कोटी रुपये देऊन रिटेन केले होते. तर धोनीला केवळ १२ कोटी रुपयांमध्ये रिटेन केले होते. तेव्हापासूनच जडेजाला कर्णधार बनवण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यानंतर जडेजा कर्णधारही झाला, पण त्याला कॅप्टन्सीमध्ये कमाल दाखवता आली नव्हती.

WhatsApp channel