मराठी बातम्या  /  क्रीडा  /  T20 World Cup 2022: 'एका वर्षात ५६-५७ खेळाडू खेळवले पण... पाकिस्तानी खेळाडूनं टीम इंडियाला डिवचलं

T20 World Cup 2022: 'एका वर्षात ५६-५७ खेळाडू खेळवले पण... पाकिस्तानी खेळाडूनं टीम इंडियाला डिवचलं

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Oct 06, 2022 03:58 PM IST

Rashid Latif on team india: भारतीय संघाने एका वर्षात अनेक खेळाडू बदलले, पण संघाला फारसे यश मिळाले नाही. असे वक्तव्य पाकिस्तानचा माजी खेळाडू राशीद लतीफने केले आहे. भारताच्या तुलनेत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या योजना खूप चांगल्या होत्या. असेही लतीफने म्हटले आहे.

team india
team india

टीम इंडियामध्ये राहुल द्रविड याला मुख्य प्रशिक्षक आणि रोहित शर्माला कर्णधार बनवल्यापासून सातत्याने प्रयोग होत आहेत. या काळात टीम मॅनेजमेंटने अनेक खेळाडूंना पदार्पणाची संधी दिली आहे. प्लेइंग-११ मध्ये संघाने वेगवेगळे कॉम्बिनेशन आजमावले आहेत. विशेष म्हणजे याच काळात तब्बल ७ खेळाडूंना भारतीय संघाची कमान सांभाळण्याची संधी मिळाली आहे. हे सर्व प्रयोग करून आता टीम इंडिया टी-20 वर्ल्ड कपसाठी रवाना झाली आहे, मात्र संघाच्या काही समस्या तशाच आहेत.

टीम इंडियाचे गोलंदाज डेथ ओव्हर्समध्ये खराब गोलंदाजी करत आहे. तसेच क्षेत्ररक्षणही खराब आहे. नुकत्याच झालेल्या आशिया चषक स्पर्धेतील पराभवाचे हे प्रमुख कारण होते. अशा स्थितीत पाकिस्तानचा माजी कर्णधार राशिद लतीफने टीम इंडियाच्या या प्रयोगांवर टोमणे मारले आहेत. भारताने एका वर्षात ५६-५७ खेळाडू खेळवले पण ते मोठी स्पर्धा काही जिंकू शकले नाही, असे लतीफने म्हटले आहे.

रशीद लतीफ याने एका पाकिस्तानी टीव्ही चॅनलवर हे वक्तव्य केले आहे. त्याला दीपक हुड्डा बाबत एक प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाच्या उत्तरात त्याने हे सांगितले. 

अँकरने विचारले की, या प्रयोगाच्या टप्प्यात दीपक हुड्डा यांना थोडे अधिक क्रिकेट खेळण्याची संधी द्यायला हवी होती का? यावर लतीफ म्हणाला, 'त्याने प्रत्येक मालिकेत मुख्य खेळाडूंना कायम ठेवले. त्याने सतत खेळाडू बदलले. वर्षभरात 56-57 खेळाडू खेळले पण एकही मोठी स्पर्धा जिंकता आली नाही. ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यांच्या तुलनेत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या योजना खूपच चांगल्या होत्या. त्यांच्यानंतर पाकिस्तानचा क्रमांक लागतो.

शेवटची आयसीसी स्पर्धा 9 वर्षांपूर्वी जिंकली होती

टी-20 वर्ल्ड कप 2022 साठी टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला रवाना झाली आहे. गेल्या ९ वर्षांत भारताने एकही आयसीसी स्पर्धा जिंकलेली नाही. भारताने शेवटच्या वेळी 2013 मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. तेव्हापासून भारतीय संघ 8 ICC स्पर्धांच्या बाद फेरीत पोहोचला आहे, ज्यामध्ये तीन फायनलचा समावेश आहे, पण त्यांना विजेतेपद मिळवता आले नाही.

WhatsApp channel

संबंधित बातम्या