Rahi Sarnobat Health Condition : “२०२२ ची वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि त्यानंतरच्या दोन विश्वचषकांसाठीची निवड चाचणी जिंकून मी राष्ट्रीय संघात सहभागी होण्यासाठी दिल्लीला निघणार होते, तिथून आम्हाला इजिप्तला जायचे होते.
मी माझ्या घराच्या दारात होते, तेव्हा अचानक माझ्या हृदयाचे ठोके वाढले. मला उष्ण वाटू लागले आणि विचित्र पद्धतीने संपूर्ण अंगात मुंग्या येण्यास सुरुवात झाली. त्यानंतर संपूर्ण शरिरात तीव्र वेदना जाणवू लागल्या. मला वाटलं मी मरेन. यानंतर मला लगेच दवाखान्यात नेण्यात आले. यानंतर माझा ईसीजी झाला तेव्हा माझ्या हृदयात सर्वकाही व्यवस्थित होते.'
हे शब्द आहेत, भारताची प्रसिद्ध नेमबाज राही सरनोबत हिचे. राही सरनोबत भारताची सर्वोत्कृष्ट पिस्तुल नेमबाज. कोल्हापूरच्या राही सरनोबतने २५ मीटर पिस्तुल नेमबाजीच्या अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवल्या आहेत. मात्र, नेमबाज राही सरनोबत हे नाव गेली दोन वर्षे झाले पडद्याआड झाकोळले होते. पण आता राही परतली आहे. एका गंभीर आजारातून तिने जबरदस्त कमबॅक केले आहे.
राहीला न्यूरोपॅथिक पेन नावाचा आजार झाआला होता. मज्जासंस्था खराब झाल्यानंतर किंवा योग्यरित्या कार्य करत नाही तेव्हा हा आजारात उद्भवतो.
पण राहीने आता या आजारतून बऱ्यापैकी रिकव्हर केले आहे. विशेष म्हणजे, राही सरनोबतने रविवारी (२ फेब्रुवारी) उत्तराखंडमधील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक पटकावले. यानंतर ३४ वर्षीय राही आता आपल्या जुन्या फॉर्ममध्ये परतल्याचे सिद्ध झाले आहे.
सुवर्ण पदकाचा वेध घेतल्यानंतर राही म्हणाली, की "मी आजारी होते आणि दोन वर्षे स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकले नाही. माध्यमांशी संवाद साधताना ती मनमोकळे पणाने बोलली.
माध्यमांशी बोलताना राही म्हणाली, की 'मी चांगली कामगिरी करत नव्हते असे नाही. पण मी आजारी होते आणि अनेक महिने अंथरुणावर विश्रांती घेत होते. पण आता मी परत येत आहे आणि तुम्ही बघू शकता की मी माझ्या प्रकृतीमध्ये बरीच सुधारणा झाली आहे."
राहीला न्यूरोपॅथिक पेनमुळे प्रचंड वेदनांचा सामना करावा लागला. या आजारातील रुग्णाला पलंगातून उठताही येत नाही.
राही म्हणाली की, तिला सुवर्णपदकाची फारशी पर्वा नाही. कारण हे पदक लवकरच विसरले जाईल. “मी २०२२ च्या राष्ट्रीय खेळांमध्येही सुवर्णपदक जिंकले होते आणि जेव्हा मी याबद्दल विचार केला, तेव्हा ती स्पर्धा कुठे झाली होती, हे मला आठवत देखील नाही.
तसेच, ती पुढे म्हणाली की, "२००६ मध्ये जेव्हा मी शूटिंगला सुरुवात केली, तेव्हा मी स्कोअर किंवा पदकांचा विचार करत नव्हते. मी फक्त विचार करत होते की मला हे खूप वर्षे करायचे आहे. मला अशी व्यक्ती बनायची नव्हती जी ४ वर्षांनंतर खेळ सोडेल ."
राही पुढे बोलताना तिच्या आजाराविषयीची माहिती दिली. तिने सांगितले की “पहिल्या ६ महिन्यांपर्यंत या आजाराबद्दल फारशी माहिती नव्हती आणि उदाहरणंही नव्हती. मी माझी सर्व शक्ती गमावली होती. मला वाटायचे की माझा एक पाय खूप जड झाला आहे आणि दुसरा पाय खूप हलका झाला आहे. कधीकधी तुम्हाला असे वाटते की तुम्ही तुमच्या कृतींवर नियंत्रण ठेवू शकत नाही.
यानंतर माझ्या शरीराचा कोणताही भाग आपोआप दुखू लागला. माझ्या हिरड्यांमध्ये आणि पापण्यांमध्येही तीव्र वेदना होत होत्या. ते इतके तीव्र होते, की माझ्या न्यूरोलॉजिस्टशिवाय मला कोणीही समजू शकत नव्हते.
यावर कोणतेही औषध किंवा उपचार नाही. तुम्हाला फक्त लक्षणांनुसार उपचार करावे लागतात. बरेच दिवस मी फक्त झोपेच्या गोळ्या घेत होते. काही दिवस जेव्हा परिस्थिती खरोखरच वाईट होती, तेव्हा मी दिवसातून १६ तास झोपत असे.
या आजाराची लक्षणे कमी व्हायला ६ महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लागला. पण ती स्वतःला भाग्यवान समजते.
ती म्हणते, "काही प्रकरणांमध्ये वेदना एका दशकापर्यंत टिकू शकतात. मला कधी कधी वाटते की कदाचित मी शूटिंगमध्ये कमबॅक करण्यासाठी खूप प्रेरित आणि आतुर होते आणि कदाचित त्यामुळेच मी वेगात रिकव्हर झाले."
"माझ्या पहिल्या लक्षणांनंतर ७ महिन्यांनी मी रेंजमध्ये गेले. माझ्यात अजिबात ताकद नव्हती आणि फक्त ३ मिनिटे बंदूक धरता यायची. पण हळूहळू मी ती ५ मिनिटे, नंतर १० मिनिटे आणि शेवटी अर्धा तासापर्यंत वाढवली. "
तिने अखेरीस २०२३ च्या उत्तरार्धात पुन्हा स्पर्धात्मक शूटिंग सुरू केले. या काळात राहीला अनेक तरुण स्पर्धकांनी मागे टाकले. २०२४ ऑलिम्पिकसाठी भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी तिने निवड चाचणीसाठी पात्र ठरण्याचा प्रयत्न केला, पण ती यशस्वी होऊ शकली नाही.
शेवटी राहीने तिला लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी व्हायचे आहे, अशी इच्छा बोलून दाखवली. ही स्पर्धा २०२८ मध्ये होणार आहे.
राही म्हणाली, “मला अखेरीस लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये भाग घ्यायचा आहे. पण तेथे बरेच तरुण आणि प्रतिभावान नेमबाज असतील. मी माझी कामगिरी गृहीत धरू शकत नाही. मला अजूनही खेळाची भूक आहे आणि मी अजूनही खूप महत्त्वाकांक्षी आहे. मला बरे व्हायचे आहे. मला तो नेमबाज बनून राहायचे आहे, ज्याच्याकडे तरुण पिढी एक प्रतिस्पर्धी म्हणून पाहतील."
संबंधित बातम्या